समाजकारण, राजकारणातील बहुआयामी भारदस्त नेतृत्व हरपले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना श्रद्धांजली

मुंबई ,१६ मार्च /प्रतिनिधी :- महाराष्ट्राच्या  राजकारण, समाजकारणातील बहुआयामी आणि भारदस्त नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनाबद्दल शोक भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांनी सरपंच ते मंत्री आणि त्याचबरोबरीने सहकार, शिक्षण, कृषी, उद्योग अशा क्षेत्रात आपल्या व्यक्तीमत्त्वाप्रमाणेच भारदस्त काम उभे केले. त्यांचा अनेक क्षेत्रांचा गाढा अभ्यास होता. अनेक सामाजिक संस्था आणि संघटनांचा आधारस्तंभ म्हणून त्यांनी चोख कामगिरी बजावली. कोपरगाव आणि शंकरराव कोल्हे या दोन्ही नावांचा एकमेकांशी अतूट असा बंध निर्माण झाला आहे. व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच त्यांची सामाजिक, राजकीय कारकीर्द भारदस्त अशीच होती. त्यांची उणीव निश्चितपणे जाणवत राहील. ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेबांच्या निधनाने, महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण, सहकार क्षेत्रातील जाणकार नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांचे निधन ही महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेबांनी नगर जिल्ह्याच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान दिलं. राजकीय, सामाजिक, सहकारक्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवला. शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्यासारख्या नेतृत्वाची उणीव कायम जाणवेल. शोकाकूल कोल्हे कुटुंबियांच्या, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केली.