कोरोनाशी लढण्यासाठी भारत सुस्थितीत : पंतप्रधान

नवी दिल्ली : देशातील 12 ते 14 वयोगटातील बालके आणि 60 वर्षावरील नागरिकांच्या कोरोना लसीकरण अभियानासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पात्र नागरिकांना विशेष आवाहन केले आहे. या लसीकरणाला बुधवारपासून प्रारंभ झालाय. त्यानिमित्ताने पंतप्रधानांनी ट्विट करत लसीकरणाचे आवाहन केले आहे.

ट्वीटर द्वारे पंतप्रधान म्हणाले की, भारताने देशवासियांच्या लसीकरणासाठी घेतलेल्या प्रयत्नांमध्ये हा दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजपासून, 12-14 वयोगटातील मुले लसीकरणासाठी पात्र आहेत आणि 60 वर्षांवरील नागरीकांनी लसीची खबरदारीची मात्रा घ्यावी. या वयोगटातील नागरिकांना मी लसीकरणाची विनंती करतो. भारताने जागतिक जबाबदारीची भूमिका निभावत लसीकरण मैत्री कार्यक्रमांतर्गत अनेक देशांना लस पाठवली. भारतीय लसींमुळे जागतिक पातळीवर कोविड-19 विरोधात सशक्तपणे लढता आले, याचा मला आनंद आहे. आज, भारताकडे अनेक ‘मेड इन इंडिया’ लसी आहेत. योग्य मुल्यमापन करुन आपण इतर लसींनाही मंजुरी दिली आहे. आम्ही आता या महामारीविरोधात लढण्यासाठी सुस्थितीत आहोत. तसेच आपल्याला कोविड संबंधित खबरदारीच्या उपाययोजनांचे नियमित पालन करत राहावे लागणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.