वैद्यकीय महाविद्यालयात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून २५ लाखांना गंडा घालणाऱ्यास अटक

औरंगाबाद,१६ मार्च /प्रतिनिधी:-तुमच्या मुलाला अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून एसटीच्‍या चालकासह त्‍याच्‍या दोन नातलगांना तब्बल २५ लाखांना गंडा घालणाऱ्या  तिघा आरोपींपैकी एकाला क्रांतीचौक पोलिसांनी बुधवारी दि.१६ पहाटे अटक केली. जितेंद्र बंडु भोसले (४८, रा. श्‍याम ट्रव्‍हर प्‍लॉट नं.४, सेक्टर १९ उलवे नवी मुंबई) असे आरोपीचे नाव असून त्‍याला १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रभारी मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी एस.डी. पंजवाणी यांनी दिले.

या प्रकरणात महादेव श्रीकृष्ण पवार (वय ५२, म्हाडा कॉलनी, महावीर चौक) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, फिर्यादींचा मुलगा सुशिक्षीत बेरोजगार होता. फिर्यादीच्‍या मीत्राने आरोपी मन्‍नालाल प्रेमचंद बन्‍सवाल (रा. खारघर, मुंबई) याची ओळख करुन दिली होती. त्‍यावेळी आरोपी बन्‍सवाल याने माझी मंत्रालयात ओळख असून मी तुमच्‍या मुलाला आरोग्य खात्‍यामध्‍ये नोकरी लावुन देतो, मात्र त्‍यासाठी सात ते आठ लाख रुपये लागतील असे आरोपीने फिर्यादीला सांगितले. त्‍यानंतर  आरोपीने फिर्यादीच्‍या मुलाचे कागदपत्र मागितले, व तीन लाख रुपये आता व उर्वरित पैसे आर्डर भेटल्यानंतर देण्याचे सांगितले. त्‍यानूसान फिर्यादीने आरोपीला तीन लाख रुपये दिले. त्‍यावेळी फिर्यादीचे नातलग नितीन सोळुंके आणि निलेश सोनवणे असे दोघे ही तेथे उपस्थित होते. आरोपीने त्‍यांना देखील नोकरी लावण्‍याचे आमिष दाखवले. १५ दिवसांनी आरोपी बन्‍सवाल हा त्‍याचा साथीदार पंडीत कौडेकर याच्‍या सोबत फिर्यादीच्‍या घरी आला. आरोपीने घरी येण्‍यापूर्वी फिर्यादीच्‍या दोन नातलगांना देखील पैसे व कागदपत्र घेवून फिर्यादीच्‍या घरी येण्‍याचे सांगितले होते. आरोपीने तुमच्‍या मुलाचे अकोला येथील आरोग्य खात्‍याच्‍या काम झाल्याचे सांगितले. त्‍यामुळे फिर्यादीच्‍या घरी उपस्थित नातलगांना देखील आरोपीवर विश्‍वास बसला. त्‍यावेळी फिर्यादीने दोन लाख तर त्‍यांच्‍या नातलगांनी प्रत्‍येकी चार लाख असे एकूण दहा लाख रुपये दिले. त्‍यानंतर फिर्यादी व त्‍यांया नातलगांनी आरोपी बन्‍सवाल, पंडीत कौडेकर आणि जितेंद्र भोसले यांच्‍या खात्‍यावर वेळोवेळी पैसे ट्रान्‍सफर केले तर काही पैसे रोख स्‍वरुपात असे सुमारे २५ लाख रुपये फिर्यादी व त्‍यांच्‍या नातेवाईकांनी आरोपींना दिले.

त्‍यानंतर आरोपीने फिर्यादी व त्‍यांच्‍या नातलगांना बनवाट ऑर्डर दिली. ते तिघे ती ऑर्डर घेवून अकोल्याच्‍या आरोग्य खात्‍यात गेले असता ती ऑर्डर बनावट असल्याचे समोर आले. त्‍यामुळे फिर्यादी व त्‍यांच्‍या नातलगांनी पैसे परत करण्‍याची मागणी केली. त्‍यावर आरोपी बन्‍सवाल याने त्‍यांना खारघर येथील घरी बोलावून त्‍यांना २५ लाखांचा धनादेश दिला. मात्र तो धनादेश न वटल्याने आपली फसवणुक झाल्याचे फिर्यादीच्‍या लक्षात आले. या प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील दत्तात्रय काठुळे यांनी आरोपीच्‍या साथीदारांना अटक करायची आहे. गुन्‍ह्यातील रक्कम हस्‍तगत करायची आहे. तसेच आरोपींनी अशा प्रकारे आणखी लोकांना गंडा घातला याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.