एसटी बसच्‍या काचेवर दगड:नुकसान करणाऱ्याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि पाच हजार २५० रुपयांचा दंड

औरंगाबाद,१४ मार्च  /प्रतिनिधी :-एसटी बसच्‍या काचेवर दगड मारुन एसटीचे पाच हजार रुपयांचे नुकसान करणार्याला कोर्टउठेपर्यंत शिक्षा आणि विविध कलामांन्‍वये पाच हजार २५० रुपयांचा दंड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्‍यायाधीश व्‍ही.एस. कुलकर्णी यांनी सोमवारी दि.१४ ठोठावली. सचिन विष्‍णु डवले (२५, रा. हनुमान चौक, चिकलठाणा) असे आरोपीचे नाव आहे.

प्रकरणात प्र‍थम वर्ग न्‍यायदंडाधिकारी यांनी आरोपीला एक वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार २०० रुपयांच्‍या दंडाची ठोठावली होती. या शि‍क्षेविरोधात आरोपीने जिल्हा व सत्र न्‍यायालयात अपली दाखल केले होते. त्‍यानंतर सत्र न्‍यायालयाने वरील प्रमाणे शिक्षा ठोठावली.

प्रकरणात एस.टी बसचे चालक नारायण विठ्ठल काकडे (५१, रा. जालना) यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, २० जून २०१४ रोज काकडे जालना आगारातून विनावाहक बस (क्रं. एमएच-२०-वाय- ५४०४) घेवून औरंगाबादकडे येत होते. दुपारी सव्‍वा दोन वाजता बस चिकलठाणा येथे आली असता आरोपी सचिन डवले हा बसच्या समोर आला व त्‍याने हातातील दगड बसच्या काचेवर मारला. यात बसची काच फुटून पाच हजारांचे नुकसान झाले. दरम्यान हद्दीत गस्त घालणार्‍या पोलिसांनी तात्काळ आरोपी डवले याला ताब्यात घेत अटक केली. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपीला प्रथम वर्ग न्‍यायदंडधिकारी यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी १९८४ कायद्याच्या कलम ३ अन्वये १ वर्षे सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंड, कलम ३३६ अन्वये २ महिने सक्तमजुरी,२०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरोधात आरोपीने जिल्हा व सत्र न्‍यायालयात अपील दाखल केले. अपीलाच्‍या सुनवाणीअंती सत्र न्‍यायालयाने आरोपीला ४२७ (३) अन्‍वय कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड आणि कलम ३३६ अन्वये कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि २५० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात सहायक लोकाभियोक्ता उल्हास पवार यांनी काम पाहिले.