लातूर जिल्ह्यातील बसस्थानकांच्या पुनर्बांधणीची कामे तातडीने पूर्ण करावीत – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

मुंबई,१४ मार्च  /प्रतिनिधी :- लातूर जिल्ह्यातील बसस्थानकांची सुरू असलेली पुनर्बांधणीची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

लातूर जिल्ह्यात ज्या बसस्थानकांच्या पुनर्बांधणीची कामे सुरू आहेत तेथील कामांच्या प्रगतीचा श्री.देशमुख यांनी आढावा घेतला. यावेळी एसटी महामंडळाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उदगीर, निलंगा, देवणी, औसा, लामजना आणि कासारशिरसी येथील बसस्थानकांची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. यापैकी औसा आणि लामजना येथील सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण व्हावीत तसेच इतर कामांपैकी ज्या कामाची फेरनिविदा काढणे आवश्यक आहे ती प्रक्रिया पूर्ण करून कामे एका वर्षात पूर्ण करावीत. त्याचप्रमाणे एसटी महामंडळामार्फत करण्यात येणाऱ्या ज्या कामासाठी निधीची आवश्यकता असेल त्यासाठी परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही श्री.देशमुख यांनी यावेळी सांगितले.