वाळू धोरणातील सहजतेसाठी धोरणात बदल – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई,१४ मार्च  /प्रतिनिधी :- अवैध वाळूचोरी हा मोठा प्रश्न असून याबाबत महसूल विभागामार्फत काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे वाळू धोरण राबवितांना त्यात सहजता कशी येईल, याबाबत प्रयत्न करण्यात येत असून वाळू धोरणात काही बदल करण्यात येत असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर परिसरातील अवैध रेतीची 8 प्रकरणे निदर्शनास आली असून संबंधितांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्या ठिकाणी सापडलेला साठा तसेच यंत्रे जप्त करण्यात आली आहे, अशी माहितीही महसूलमंत्री श्री.थोरात यांनी यावेळी दिली.

विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांनी लाखांदूर येथे वाळू चोरी होत असल्याबाबतचा व्हिडिओ असलेला पेनड्राईव्ह सभापती रामराजे निंबाळकर-नाईक यांच्याकडे सुपूर्द केला. याबाबत योग्य ती चौकशी करावी, असे निर्देशही सभापती यांनी महसूलमंत्री यांना दिले.

अवैध रेती चोरीसंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके, प्रविण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे, अभिजित वंजारी यांनी विचारला होता.

सर्व कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यात येणार – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

बृहन्मुंबईतील 41 कोळीवाड्यांपैकी 31 कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण झाले असून 4 कोळीवाड्यांचे सीमांकन प्रगतीपथावर आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर विरोध असल्याने सीमांकन होऊ शकले नाही. तथापि, विरोध कमी झाल्यास त्याही ठिकाणी सीमांकन करण्यात येईल तसेच कोकणपट्टीच्या सर्वंच कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यात यावे, अशा सूचना  जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत विधानपरिषद सदस्य रमेशदादा पाटील, ॲड निरंजन डावखरे, प्रसाद लाड, प्रविण दरेकर, भाई गिरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.