राष्ट्रकूट शिल्पसौंदर्याचा परमोच्च आविष्कार म्हणजे वेरूळ लेणी-डॉ. दुलारी कुरेशी

अमेझिंग औरंगाबादचा हेरिटेज वॉक उत्साहात

औरंगाबाद,१३ मार्च  /प्रतिनिधी :- राष्ट्रकूट शिल्पसौंदर्याचा परमोच्च आविष्कार म्हणजे वेरूळ लेणी. येथील हिंदू, बौद्ध आणि जैन लेण्यांमधून कोरलेली शिल्पे आज सुमारे दीड हजार वर्षांनंतरही आपल्याला आपल्या पूर्वजांचे कलाविष्कार दाखवून थक्क करतात, असे मत इतिहासतज्ज्ञ डॉ. दुलारी कुरेशी यांनी आज वेरूळ लेणीत व्यक्त केले.

अमेझिंग औरंगाबाद ग्रुपतर्फे वेरूळ येथे रविवारी हेरीटेज वॉक आयोजित करण्यात आला होता. सकाळी आठ वाजता सुरू झालेला हा वॉक दुपारी एकच्या सुमारास संपला. यावेळी डॉ. दुलारी कुरेशी आणि रफत कुरेशी यांनी इतिहासप्रेमींना मार्गदर्शन केले. सुरुवातीला ऍड. स्वप्नील जोशी यांनी या हेरिटेज वॉकच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. श्रीकांत उमरीकर, हर्षवर्धन दीक्षित यांनी कुरेशी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

त्यानंतर कैलास लेणी आणि विश्वकर्मा लेणीतील शिल्पांचे निरीक्षण करून इतिहासप्रेमींनी माहिती जाणून घेतली. तंत्रयान, महायान आणि भगवान बुद्धाशी निगडित अनेक पैलू यावेळी कुरेशी यांनी उलगडून सांगितले. डॉ. कुरेशी यांच्यासह योगेश जोशी, संजय पाईकराव आणि मयुरेश खडके यांनीही उपस्थितांना येथील शिल्पकलेतील बारकावे समजावून सांगितले.

याप्रसंगी जसवंत सिंग, योगेश जोशी, डॉ. संजय पाईकराव, डॉ. कामाजी डक, मयुरेश खडके, ज्ञानेश्वर पाटील, अमित देशपांडे, सुनीता पिंपरीकर, गार्गी परमार, किरण भाले, मुकुंद पत्की आदींसह शहरातील आबालवृद्धांनी सहभाग नोंदवला.