चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्व घटकांचा विचार करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प -अजितदादा पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला सन २०२२-२३ चा अर्थसंकल्प

मुंबई ,११ मार्च / प्रतिनिधी :- आमचे सरकार आल्यानंतर लगेचच जगावर कोरोनाचे संकट आले. त्यात देश आणि भारतातील सर्व राज्यांवर आर्थिक संकट कोसळले. केंद्र सरकारने घालून दिलेल्या कर्जाच्या मुदतीत तीन टक्क्यांपर्यंत कर्ज काढून कुठेही विकासकामांना निधी कमी पडू दिला नाही. विकासाची पंचसूत्री आजच्या अर्थसंकल्पातून मांडली. इन्फ्रास्ट्रक्चर उभे केल्याशिवाय विकास होऊ शकत नाही. हे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करत असताना समाजातील वंचितांनाही आधार देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून केला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर केले.

चांद्यापासून ते बांद्यापर्यत सर्व घटकांतील कामांना स्पर्श करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आपला देश कृषिप्रधान देश असल्यामुळे शेतकऱ्यांना विशेष सवलती जाहीर केल्या. तसेच दळणवळणामध्ये जल वाहतूक, हवाई वाहतूक, भूमिगत वाहतूक, भूपृष्ठ आणि रेल्वे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

तसेच एसटी संदर्भात बोलत असताना अजितदादा म्हणाले की, “टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ३ हजार पर्यावरणपूरक बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे इंधनाचा मोठा खर्च कमी होऊन त्याचा लाभ गोरगरीब नागरिकांना होईल. अडीच हजार मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तसेच नवीन घरकुल बांधणी आणि शहरी भागातील गोरगरिबांना घरे देण्यासाठीही कार्यक्रम आखण्यात आला आहे.”

अर्थसंकल्पात ‘पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजना’ जाहीर करण्यात आली आहे. कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी या योजनेत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून भांडवलाच्या कर्जावरील व्याजाची १०० टक्के परतफेड करण्यात येईल, अशी घोषणा यावेळी अजितदादांनी केली. गॅसचा कर १३.५ वरुन ३ टक्क्यांवर आणला१३.५ टक्के गॅसचा असलेला कर ३ टक्क्यावर आणला आहे. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या, घरगुती गॅसचे दर कमी राहायला मदत होईल. घरगुती गॅसचे दर कमी केल्यामुळे गृहिणी असलेल्या माझ्या अनेक भगिनींना मोठ्या प्रमाणात सवलत मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.