केंद्रीय अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांकडून थोडे मार्गदर्शन घ्यावे – खा. सुप्रियाताई सुळे

मुंबई ,११ मार्च / प्रतिनिधी :- आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली. सुसंस्कृत, आदर्श अशा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केलेल्या भाषणातून स्व. यशंवतराव चव्हाण आणि कुसुमाग्रजांची आठवण झाल्याचे सुप्रियाताई म्हणाल्या. याशिवाय केंद्रीय अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांकडून थोडे मार्गदर्शन घ्यावे अशी सूचनाही त्यांनी यानिमित्ताने केली.

राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य माणसावर प्रेम करणारा आहे. देशाचा विकासदर हा आठ आणि नऊ यादरम्यान आहे पण महाराष्ट्र राज्याचा विकासदर बारा टक्क्यांवर म्हणजेच डबल डिजीटमध्ये असल्याबाबत सुप्रियाताईंनी समाधान व्यक्त केले. सर्वाधिक जलद गतीने विकासकामे होणारे राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याचा उल्लेख होतो हे केंद्रीय अहवालातून समोर आले असल्याचेही सुप्रियाताई म्हणाल्या.केंद्र सरकारच्या बजेटमध्ये खासदार आणि राज्यांच्या निधीमध्ये काटछाट दिसून येते. परंतु महाराष्ट्राचे बजेट मांडताना अजितदादांनी ना आमदारांवर ना जिल्ह्यांवर अन्याय केला. समान वाटप करून सामाजातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही या बजेटमध्ये देण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये काटछाट करताना महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांचे थोडेसे मार्गदर्शन घ्यावे, अशी सूचना सुप्रियाताईंनी केली.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडताना अतिशय महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.आरोग्य, कृषी यांसह विविध खात्यांसाठी भरीव तरतूद करताना त्यांनी सर्व घटकांना समान न्याय दिला आहे.यामध्ये स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक व तुळापूर येथील स्मारकासाठी २५० कोटी रुपयांची तरतूद केली असून यावर्षापासून असामान्य शौर्य व साहस दाखविणाऱ्या राज्यातील नागरिकांना छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या महाराणी सईबाई यांच्या स्मारकासाठी निधी देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. राजगड, तोरणा, शिवनेरी व विजयदुर्ग या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. तर महात्मा फुले यांच्या ‘फुलेवाडा’ या राज्य संरक्षित स्मारकासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येणार आहे.यासह कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ विकासासाठी देखील निधी देण्यात येणार आहे. राज्यातील राष्ट्रपुरुषांच्या शाळांचा विकास करण्यासाठी त्यांनी निधीची घोषणा केली आहे. यामध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमात महापुरुषांच्या गावांतील शाळांचा विकास करण्यात येणार असून यामध्ये महात्मा फुले यांचे गाव खानवडी,ता. पुरंदर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव यांचा समावेश आहे. याशिवाय राजर्षी शाहू महाराज यांचे जन्मगाव कागल, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलेली सातारा येथील शाळा, वाटेगाव, ता. वाळवा येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची शाळा, क्रांतिसिंह नाना पाटील यांची येडे मच्छिंद्र येथील शाळा यांचा समावेश आहे. सामाजिक न्यायाचे सुत्र अधिक बळकट करण्यासाठी तृतीयपंथीयांना ओळखपत्र आणि रेशनकार्ड देण्यात येणार आहे. सफाई कामगारांसाठी यापुढे अत्याधुनिक मशीन्स देण्यात येणार आहेत.दळवळण सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी पुणे रिंग रोडसाठी १५०० कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. तर आरोग्यासाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून यामध्ये पुणे परिसरात इंद्रायणी मेडिसिटी उभारण्याच्या महत्त्वपूर्ण घोषणेचा समावेश आहे.