औरंगाबादच्या निजामकालीन बंधाऱ्यांची दुरूस्ती करणार –जलसंपदामंत्री जयंत पाटील

औरंगाबाद,११ मार्च / प्रतिनिधी :-औरंगाबाद जिल्ह्यातील निजामकालीन बंधारे हे दोनशे पन्नास वर्षापूर्वीचे आहे. येथील 4 निजामकालीन बंधाऱ्यापैकी एक बंधारा पुलाच्या खाली असल्याने तो बऱ्या स्थितीत आहे. अन्य बंधारे हे नादुरुस्त असल्याने आवश्यक विशेष दुरूस्ती व पुनर्रचना करून व जल संचय क्षेत्रातील गाळ, झुडपे काढून साठवण क्षमता पुनर्स्थापित करण्यात येईल. तसेच या निजामकालीन बंधाऱ्यांची दुरूस्ती व डागडुजी करून पर्यटनाच्या दृष्टीने जलसंपदा विभागाकडून रक्कम खर्च करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

या निजामकालीन बंधार्‍याच्या दुरूस्तीसंदर्भात मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.11) विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.

अजिंठा येथे 11 दरवाजांचा 250 वर्षांपूर्वीचा निजामकालीन बंधारा आहे. हा प्रकल्प मराठवाड्यात असला तरी त्याचा तापी नदीच्या वाघूर उपखोर्‍यात समावेश होतो. मात्र तापी खोरे एकात्मिक जलविकास आराखड्यात या बंधार्‍याची नोंदच नसल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देत या आराखड्यात निजामकालीन बंधार्‍याचा समावेश न केल्याबद्दल संबंधीत अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी केली. या बंधार्‍याची दुरूस्ती केल्यास याठिकाणी कायम स्वरूपी पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच सिंचन प्रकल्पासह पर्यटन स्थळ विकसित होऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या बंधार्‍याच्या दुरूस्तीसाठी त्वरीत निधीसह प्रशासकीय मान्यता द्यावी अशी आग‘ही मागणी आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहात केली.

     आ.सतीश चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी, सदरील बंधार्‍याचा तापी खोरे एकात्मिक जलविकास आराखड्यात याचा समावेश का झाला नाही याची माहिती घेतली जाईल. या निजामकालीन ऐतिहासिक बंधार्‍याचा तापी खोरे एकात्मिक जलविकास आराखड्यात समावेश नसला तरी पर्यटनाच्या दृष्टीने या बंधार्‍याच्या पुर्नबांधणी तसेच दुरूस्तीसाठी जलसंपदा विभागाच्यावतीने तातडीने निधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाणार असल्याचे सभागृहात सांगितले.