जालना शहर वाहतूक शाखेच्या वतीने पार्किंग संदर्भात मुख्य बाजारपेठेत जनजागृती

जालना ,११ मार्च / प्रतिनिधी :- मागील काही महिन्यापासून जालना शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून शहर वाहतूक शाखेच्या वतीने पार्किंग बाबतीत काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

ग्रामीण भागातून आलेल्या दुचाकी वाहनधारक पी1 – पी2 बाबतीत अनभिज्ञ असल्यामुळे वाहन धारक कडून काटेकोरपणे नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत होते. अशा वाहनधारकांवर वारंवार शहर वाहतूक शाखेच्या वतीने दंड आकारण्यात सुद्धा येत आहे परंतु नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर दंड वसूल करणे हा पी1 – पी2 चा मूळ उद्देश नसून रहदारी सुरळीत व्हावी व वाहनधारकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याची सवय लागावी जेणेकरून बाजारपेठेमध्ये आलेल्या लोकांची आडव्या-तिडव्या लावलेल्या वाहनांमुळे गैरसोय होऊ नये हा मुळ उद्देश असल्याचे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

शहरातील अरुंद रस्ते,ट्राफिकची समस्या सोडवण्यासाठी शहर वाहतुक शाखेने शहरात पी 1,पी 2 पध्दत सुरू केलेली असून या नियमाच गाडी पार्किंग करणाऱ्यांनी पालन करावं असं आवाहन शहर वाहतुक शाखेच्या वतीने करण्यात आलं आहे.शहरातील वाहतूक समस्या त्याच बरोबर पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी वारंवार सामाजिक संघटना आणि नागरीकांकडून पोलीस अधीक्षक तसेच शहर वाहतूक शाखेला निवेदने देण्यात आली होती.बाजारपेठेतील व्यवसायिकाने पार्किंग संदर्भात आपल्या दुकानासमोर बोर्ड लावल्यामुळे ग्रामीण भागातील वाहनधारकांना ते सहज समजून येत आहे. त्यामुळे रहदारी सुरळीत होण्यासाठी मदत होत असल्यामुळे बोर्ड लावणाऱ्या  व्यवसायिकांचे पोलिसांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी शहर वाहतूक शाखेचे पो.निरी. गुणाजी शिंदे, पो.काॕ.भगवान बनसोडे, पो.अमलदार नंदकिशोर टेकाळे ,नंदकिशोर कामे आदींची उपस्थिती होती.