बदनापूर तालुक्यातील मागासवर्गीय वस्त्यांसाठी एक कोटींचा निधी मंजूर

भाऊसाहेब घुगे यांच्या पाठपुराव्यास  यश

जालना ,११ मार्च / प्रतिनिधी :-बदनापूर तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये दलित व मागासवर्गीय वस्त्यांत सिमेंट रस्ते,  भूमिगत गटार, समाज मंदिर, स्मशान भूमी रस्ते आदी पायाभूत सुविधांच्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध होण्याबाबत युवा सेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी केलेल्या पाठपुराव्याची  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेत  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे एक कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती भाऊसाहेब घुगे यांनी शुक्रवारी दिली. 

बदनापूर तालुक्यातील भराडखेडा, आन्वी, वाल्हा, अकोला (  निकळक) , निकळक ( अ),सिंधी पिंपळगाव, रांजणगाव, चित्तोडा, कस्तुवाडी, माजगांव, सह आदी गावांमधील मागासवर्गीय व दलित वस्त्यांमध्ये पायाभूत विकास कामांकरिता निधी मिळण्यासाठी भाऊसाहेब घुगे यांनी शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, माजी आ. संतोष सांबरे व जिल्हा प्रशासनामार्फत  सामाजिक न्याय  विभागाकडे पाठपुरावा केला होता. तसेच  धनंजय मुंडे यांची युवा सेना जिल्हा समन्वयक भरत सांबरे यांच्या समवेत  मंत्रालयात भेट घेऊन निधी देण्याबाबत मागणीही केली होती, त्यांच्या मागणीची मुंडे यांनी दखल घेत निधी वितरित करण्याचे आदेश दिले . नुकतेच 03 मार्च 2022 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढलेल्या आदेशानुसार भराडखेडा ता. बदनापुर येथे मागासवर्गीय वस्त्यांमध्ये भुमीगत गटार, सिमेंट रस्ता, ( आन्वी) भूमिगत गटार व सिमेंट रस्ता तसेच  मागासवर्गीय वस्तीमध्ये समाज मंदिर बांधकाम, सिंधी पिंपळगाव ता. बदनापुर येथे स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम, (वाल्हा)  भूमिगत गटार व सिमेंट रस्ता, अकोला निकळक येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये सिमेंट रस्त्याचे बांधकाम , अशा   विकास कामांना मंजुरी देण्यात आली. असून उर्वरित विकासकामांसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे भाऊसाहेब घुगे यांनी सांगितले.