मोदींची सूचक वक्तव्य महाआघाडीच्या थेट वर्मावर

तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन मोदींचा विरोधकांवर निशाणा

Image

नवी दिल्ली ,१० मार्च / प्रतिनिधी :-महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांविरुद्ध सध्या भ्रष्टाचाराच्या चौकशा  सुरू आहेत. IT, ED यांनी सरकारमधल्या विशेषतः राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना लक्ष्य केलेलं असतानाच मोदींच्या भाषणात सूचक विधानं आली. ती बरोबर महाराष्ट्र सरकारच्या वर्मावर बोट ठेवणारी आहेत.

Image

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसह चार राज्यांमध्ये भाजपाचा मोठा विजय २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी एक मोठा संकेत असल्याचे वर्णन केले आहे. या निकालांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकांना सुशासन, जातीवादाऐवजी विकासाचे राजकारण हवे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोदींच्या विजयोत्सवाच्या भाषणात वास्तविक भ्रष्टाचाराचा आणि सेंट्रल एजन्सीचा मुद्दा येणं सहाजित नव्हतं. पण तरी मोदी बराच वेळ यावर बोलले. मोदी म्हणाले, “जनता भ्रष्टाचाराला कंटाळली आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांचाही  तिटकारा आला आहे. यापुढे कुठल्याही दबावाला न झुकता भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल. “

“आधी हजारो कोटींचा भ्रष्टाचार करतात आणि मग तपासही होऊ देत नाहीत. तपास केला तर त्यांच्यावर दबाव आणला जातो. ही या लोकांची प्रवृत्ती आहे. हे लोक कोणत्याही भ्रष्ट्राचारी व्यक्तीवर कारवाई झाली की त्याला धर्माचा, जातीचा रंग देतात. कोणत्या माफियाविरुद्ध न्यायालयाने निर्णय दिला तरी हे लोक त्याला धर्म आणि जातीसोबत जोडतात. मी सर्व प्रामाणिक लोकांना विनंती करू इच्छितो की अशा माफियांना आपल्या समाजातून, संप्रदायातून आणि जातीतून दूर करण्याचा प्रयत्न करावा. हा पंथ मजबूत होईल, समाज मजबूत होईल,” असे पंतप्रधान म्हणाले.

Image

मोदींची ही विधानं कुणासाठी?

  • स्वतः घोटाळे करणारे लोक चौकशी सुरू झाली की तपास यंत्रणांवर दबाव आणतात.
  • केंद्रीय संस्थांवर घोटाळेबाजच अविश्वास दाखवतात. त्यांचा न्यायपालिकेवरही विश्वास राहिलेला नाही.
  • आधी हजारो करोड रुपयांचा भ्रष्टाचार करायचा आणि त्याचा तपासही होऊ नये यासाठी दबाव आणायचा, असं या घोटाळेबाजांचं काम आहे.
  • अशा भ्रष्टाचाऱ्यांचीस, त्यांच्या गैरव्यवहारांची चौकशी सुरू झाली की ते धर्म, जात, प्रांत असा रंग देऊन वेगळीकडेच लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात.
  • अशा दबावाला आता बळी पडणार नाही. भ्रष्टाचाराविरोधात चौकशी करणाऱ्या एजन्सीवर दबाव आणला तरी कडक कारवाई सुरूच राहणार.
  • लोकांचा विश्वास आहे की, भ्रष्टाचाराविरोधात आणि घोटाळेबाजांविरोधात कारवाई करण्याची धमक फक्त भाजप या एकाच पक्षात आहे.
  • घोटाळ्यात अडकलेले सगळे लोक एक होतात आणि चौकशी यंत्रणांवरच अविश्वास दाखवता

शरद पवार यांनीदेखील महाआघाडी सरकार कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण आमचं सरकार मजबूत आहे, असं विधान केलं होतं. फडणवीस यांनी विधानसभेत उघड केलेल्या पेन ड्राइव्ह बाँबमागेही सेंट्रल एजन्सीजच्या हात असल्याचं विधान शरद पवार यांनी बुधवारीच केलं होतं. मोदींनी त्यांच्या भाषणात सेंट्रल एजन्सीवर अविश्वास दाखवणाऱ्यांचा उल्लेख नाव न घेता केला. 

“उत्तर प्रदेशात अशा राजकारणामुळे लोकांनी मोठे नुकसान सहन केले आहे. उत्तर प्रदेशच्या लोकांच्या प्रेमान मला उत्तर प्रदेशचे बनवले आहे. मी वाराणसीचा खासदार असल्याच्या नात्याने मी अनुभवाने सांगतो की उत्तर प्रदेशचे लोकांनाही राज्याच्या विकासाला सर्वोच्च स्थान देण्याचे कळले आहे. स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षाचा विचार करता, या निवडणूक निकालांना खूप महत्त्व आहे,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.