गोवा आणि यूपीतही शिवसेनेचे डिपॉजिट जप्त; ‘नोटा’पेक्षाही कमी मत

मुंबई ,१० मार्च / प्रतिनिधी :-गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. राज्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर झाली. मात्र गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र, या दोन्ही पक्षांचा हिरमोड झाला आहे.

निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला 0.25% मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्या 1.06% मतं आहेत. सगळ्यात विशेष बाब म्हणजे नोटालाही या दोन्ही पक्षांपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. 1.17% मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला आहे.भाजपला गोव्यात सर्वाधिक मतवाटा मिळाला असून त्यापाठोपाठ काँग्रेस, मगोप, आप, तृणमूल काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पक्ष यांचा क्रमांक आहे.

पक्ष आणि मिळालेली मतं

  • भाजप (33.60%)
  • काँग्रेस (23.54%)
  • महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष (8.60%)
  • आप (6.78%)
  • तृणमूल काँग्रेस (4.89%)
  • नोटा (1.17%)
  • गोवा फॉरवर्ड पक्ष (1.14%)
  • राष्ट्रवादी (1.06%)
  • शिवसेना (0.25%)
  • इतर (18.98%)
यूपीतही शिवसेनेचे डिपॉजिट जप्त

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मात देण्यासाठी शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरली. निवडणूक जाहीर होताच भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने यूपीत मोर्चेबांधणी सुरु केली होती. मात्र शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतदान झाले आहे.

उत्तर प्रदेशात शिवसेनेने स्वतंत्रपणे उमेदवारी उभे केले होते. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून 60 उमेदवार उभे करण्यात आले होते. पण निवडणूक आयोगाने 19 जणांची उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे 41 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते. उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना 0.02 टक्के मते मिळाली. तर नोटा पर्यायाला 0.71 टक्के मते मिळाली.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी युपीत 60 जागांवर उमेदवार उभे करु आणि त्या 60 जागांवर शंभर टक्के जिंकूनच येऊ, असा निर्धार केला होता. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते, महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे स्वत: युपीत प्रचारासाठी गेले होते.

पहिल्यांदाच उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाकरे कुटुंबीयांतील आदित्य ठाकरे उत्तर प्रदेशात दाखल झाले होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याबरोबर आदित्य ठाकरेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरखपूरमध्ये प्रचारसभा घेतली. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी थेट भाजपवरही निशाणा साधला होता.