वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांच्या मानधनवाढीच्या मागणीवर शासन सकारात्मक विचार करेल – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई ,८ मार्च / प्रतिनिधी :- राज्यातील वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी विविध स्तरांवरुन होत असून राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग या मागणीवर सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत दिली.

सर्वश्री सुनिल प्रभू, वैभव नाईक, राजन साळवी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख म्हणाले की, कोरोनाकाळातील निर्बंधांमुळे सांस्कृतिक, कला, मनोरंजन क्षेत्रावर आभाळ कोसळले, या क्षेत्रातील कलावंतांच्या उपजीविकेचा प्रश्न भागविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व घटकांसाठी मदतीचा हा निर्णय असून जिल्हाधिकाऱ्यांना यासाठी प्राधिकृत केले आहे. ते नावे तपासून शासनाला सादर करतील असे सांगून आपल्या क्षेत्रातील गरजू कलावंतांना मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस करण्याचे आवाहनही मंत्री श्री.देशमुख यांनी केले.

राज्यातील पात्र वृद्ध साहित्यिक आणि कलावंत मानधन योजनेंतर्गत प्रतिवर्षी प्रत्येक जिल्ह्यातील सन्मानार्थी निवडीचा इष्टांक ६० वरुन १०० वर करण्यात आला असून सदस्यांची मागणी लक्षात घेता या इष्टांकाच्या धोरणाचा पुनर्विचार करुन व्याप्ती वाढविण्यात येईल, मर्यादेमुळे कुणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही देऊन कोरोनाकाळात घोषित केलेले सहाय्य कलावंतांना देण्यासाठी जलदगतीने कार्यवाहीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, यात दिरंगाई आढळल्यास कारवाई करण्याचा इशाराही श्री. देशमुख यांनी यावेळी दिला.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या समित्यांची पुनर्रचना करण्यात येईल असे सांगून कलावंतांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी विधानसभा सदस्यांची लवकरच बैठक घेऊन सूचनांचा समावेश धोरणात करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी सांगितले.

आंदोलनप्रकरणी लोककलावंतांवर दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी गृहमंत्र्यांशी चर्चा करणार

लोककलावंतांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले होते, याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले असून हे गुन्हे मागे घेण्यासाठी गृहमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. यावेळी सभागृहात उपस्थित गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही या सूचनेवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.

या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, सुधीर मुनगंटीवार, ॲड. आशिष शेलार, भास्कर जाधव आदी सदस्यांनी सहभाग घेतला.