“पाणी हेच जीवन” उपक्रमांतर्गत बिलोणी येथे नाला खोलीकरणाचे उदघाटन

वैजापूर, ता.8 मार्च/ प्रतिनिधी –तालुक्यातील बिलोणी येथे जलजागरूकता म्हणून निर्मळ इन्स्टिट्यूट,वैजापूरतर्फे नाला खोलीकरण उपक्रम राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून मंगळवारी नाला खोलीकरण कामाचे उदघाटन करण्यात आले.

ग्रामीण भागात आजही शेतकरी बांधव व भगिनींना पाणी अडवून पाणी साठविण्याचे महत्व पुरेसे ध्यानी आलेले नाही यासाठी ग्रामीण भागात नाला खोलीकरण करून पावसाचे पाणी अडवून ग्रामस्थांमध्ये जलजागरूकता निर्माण करण्याची नितांत गरज आहे असे प्रतिपादन जलदुत धोंडीरामसिंह राजपूत यांनी यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधत असताना केले.

सामाजिक बांधिलकी जपून शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने झटत असलेली “निर्मला इन्स्टिट्यूट वैजापूर”मार्फत तालुक्यात नाला खोलीकरण सातत्याने करून शेतकऱ्यांना व ग्रामस्थाना पाणी उपलब्ध  करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. बिलोणी येथील नाला खोलीकरण हा 13 वा उपक्रम आहे.

या इन्स्टिट्यूटच्या नॅन्सी रोड्रिक्स यांनी सांगितले की,ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी मिळावे व पावसाचे पाणी साठविण्याबाबत त्यांच्यात जागरूकता निर्माण व्हावी हा या उपक्रम राबविण्यामागचा उद्देश  आहे. याप्रसंगी सरपंच गायत्री सुनील कदम, बाजार समितीचे सदस्य सुनील कदम, पारसनाथ पवार, दादा भाऊ कदम, परशराम पवार, मंगल पवार, छाया बंगाळ, काशाबाई पवार, कविता कदम, योगिता कदम, लता भगत यांची उपस्थिती होती.सुत्रसंचलन व आभार इरफान सय्यदयांनी केले. बरेच ग्रामस्थ या उपक्रमात सहभागी झाले आहेत.