वैजापूर पालिकेचे शंभर टक्के वसूलीचे उद्दिष्ट ; वसुलीसाठी शहरात चार पथके 59 मोठ्या थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडले

वैजापूर ,७ मार्च / प्रतिनिधी :- शासन आदेशानुसार वैजापूर पालिकेतर्फे शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत असून कराची थकीत रक्कम वसुलीसाठी शहरात चार वसुली पथके नियुक्त करण्यात आली आहेत.पालिकेने आतापर्यंत  शहरातील मोठ्या थकबाकीदार असलेल्या 59 जणांचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई केली आहे.
वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी बी.यु.बिघोत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील चार वसुली झोन साठी चार विशेष वसुली पथक नियुक्त करण्यात आले आहे.थकीत कराची रक्कम न भरणाऱ्या विरुध्द कठोर कारवाई करण्यास पालिकेने सुरुवात केली असून त्यानुसार आतापर्यंत 59 थकबाकीदारांचे पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे. जे थकबाकीदार थकीत कराची रक्कम नगरपालिकेत जमा करणार नाहीत त्यांची मालमत्ता जप्त करून लिलावाद्वारे थकबाकीची रक्कम वसूल करण्यात येईल.तरी थकीत कराची रक्कम भरून पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी बी.यु.बिघोत यांनी केले आहे.