पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाला वाचवण्यासाठी उभा केला डमी आरोपी : खंडपीठाची नगर पोलिस अधीक्षकांना नोटीस

औरंगाबाद,७ मार्च / प्रतिनिधी :-अपघाताच्या गुन्ह्यात अडकलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाला वाचवण्यासाठी  त्याच्या जागी डमी आरोपी उभा करुन या डमी आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याच्या पोलिसांच्या कृतीविरुध्द मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद  खंडपीठात याचिका सादर करण्यात आली असून न्यायमूर्ती व्ही के जाधव आणि न्यायमूर्ती एस सी मोरे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक, पोलीस आयुक्तांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

नगर रोडवरील ढोरेगाव येथील राधिका पेट्रोलपंपासमोर १८ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका हुंदाई कारने मोटार सायकलस्वार बाबासाहेब बोराडे यांना धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. बाबासाहेब यांचे भाऊ पुंजाराम यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात  दिलेल्या तक्रारीआधारे अमरजित बावीस्कर याच्याविरुध्द गुन्हाही दाखल झाला. परंतु, न्यायालयात मात्र रिक्षाचालक रवि सोनीराम काकडे याच्याविरुध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
हे दोषारोपपत्र लक्षात घेऊन पुंजाराम बोराडे यांनी रविंद्र गोरे यांच्यामार्फत  खंडपीठात  याचिका दाखल केली. अ‍ॅड्. गोरे यांनी युक्तीवाद केला की, आरोपी अमरजित हा पोलीस अधिकाऱ्याचा  मुलगा असल्यामुळे तसेच अपघाताच्या वेळी त्याचा कारचा विमा नसल्यामुळे त्याला नुकसान भरपाईपासून आणि गुन्ह्यापासून वाचवण्यासाठी  पोलिसांनी डमी आरोपी उभा केला आहे. पोलिसांनी अशी केस तयार केली की, बाबासाहेबांच्या मोटारसायकलीचा रवि काकडे याच्या रिक्षाला धक्का लागला. त्यामुळे मोटारसायकल व बाबासाहेब हे डिवायडरला धडकले व पलिकडच्या रस्त्यावर नगरकडून येणाऱ्या  कारला त्याची मोटारसायकल धडकली.
या गुन्ह्यात सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा दाखल करणे गरजेचे असताना तो दाखल केलेला नाही. डमी आरोपी उभा करताना दाखवलेली रिक्षा भंगारमधील आहे. रवि काकडे याचा गंगापूरचा पत्ता दाखवला असला तरी तो तेथे राहात नाही. पंचनाम्यात अमरजित याची कार आणि बाबासाहेब याची मोटारसायकल यांच्यात अपघात झाल्याचा उल्लेख टाळण्यात आलेला आहे. अमरजितच्या कारचे बंपर फुटलेले व त्याला रक्त लागलेले असल्याचे सिध्द करणारा साक्षीदार उपलब्ध आहे. तसेच डमी असलेल्या आरोपी रवि याने आपला निष्काळजीपणा मान्य केल्यासारखा आहे. या सर्व गोष्टीवरुन अमरजित याला वाचवण्यासाठीच डमी आरोपी उभा केल्याचे दिसून येते. या युक्तीवादानंतर न्यायालयाने पोलिस  अधिक्षक आणि पोलिस आयुक्त यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी अ‍ॅड्. गोरे यांना  चंद्रकांत बोडखे, स्वप्नील मुळे व पल्लवी वांगीकर सहकार्य करीत आहेत.