देश आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थ संकल्पात अनेक बाबींची तरतूद-केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

जालना ,६ मार्च / प्रतिनिधी :-भारत देश आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थ संकल्पात अनेक बाबींची तरतूद करण्यात आली असून सर्व क्षेत्राला चालना देणारा यंदाचा केंद्रीय अर्थ संकल्प असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी येथे सांगितले.      

महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी संमेलन, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रिकल्चर व महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने  ‘ केंद्रीय अर्थ संकल्प २०२२’ या विषयावर आयोजित परिसंवादाचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उद्योजक व कलश सीड्सचे अध्यक्ष सुरेश  झुनझुनवाला हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अखिल भारतीय कृषी उद्योग डिलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी आदी यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विचारमंचावर  मारवाडी संमेलनाचे जालना जिल्हाध्यक्ष सुभाष देविदान, उद्योजक घनश्यामदास गोयल, मारवाडी युवा मंचचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमेश पंचारिया आदींची उपस्थिती होती.       

यावेळी बोलताना डॉ. कराड पुढे म्हणाले की, यंदाचा केंद्रीय अर्थ संकल्प हा कोवीड महामारी समोर ठेवून तयार करण्यात आला आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असल्याने या केंद्रीय अर्थ संकल्पाला ‘अमृतकालका बजेट” म्हणून संबोधले गेले आहे. देशाच्या पुढील पंचवीस वर्षांच्या विकासाचा विचार करून हा केंद्रीय अर्थ संकल्प तयार करण्यात आला आहे. आपला देश आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी यंदाचा केंद्रीय अर्थ संकल्प हा ३९ लाख ४५ हजार कोटी रुपयांचा आहे. सन २०१४ पासून केंद्रीय अर्थ संकल्पात वाढ करण्यात येत आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थ संकल्पात  आरोग्य, शिक्षण, कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले आहे. छोट्या व्यावसायिकांना  आत्मनिर्भर भारत योजनेतंर्गत आर्थिक मदत केली जात आहे, त्यात वाढ करण्यात आली आहे. प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेसाठी अधिक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.केंद्रीय अर्थ संकल्पात सीमावर्ती भागात रस्ते, राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. सर्व सामान्य माणूस, शेतकरी, उद्योजक आदींना दिलासा देणारा यंदाचा केंद्रीय अर्थ संकल्प असल्याचे डॉ. कराड म्हणाले. केंद्र व राज्य सरकारच्या महत्त्वाच्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा, असे आवाहनही डॉ. कराड यांनी यावेळी केले.          

प्रमुख अतिथी म्हणून बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की,  यंदाचा केंद्रीय अर्थ संकल्प हा सर्व सामान्य माणसाला दिलासा देणारा आहे. या केंद्रीय अर्थ संकल्पात रेल्वे खात्यासाठी महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. भारतभर ४०० वंदेमातरम् रेल्वे सुरू करण्यात येणार आहेत. जळगाव- जालना दरम्यान नवीन रेल्वे मार्ग व्हावा, यासाठी या  रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याशिवाय नांदेड- जालना दरम्यान रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्यात येणार आहे. जालना शहरात १०० कोटी रुपये खर्चाची पिट लाईन मंजूर करण्यात आली आहे. या पिट लाईनमुळे रोजगार निर्मिती होणार आहे. जालना जिल्ह्याच्या विकासासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे ना. दानवे यांनी यावेळी सांगितले.          

यावेळी ललित गांधी, मनमोहन कलंत्री आदींनी मार्गदर्शन करतांना व्यापारी, उद्योजक आदींना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. अर्थ खात्याने याकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले.            

प्रारंभी जालना जिल्हा चार्टर्ड अकाऊंट संघटनेचे अध्यक्ष दर्शन जैन यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन तोतला यांनी केले. यावेळी गोविंदप्रसाद मुंदडा, गोपाल मानधानी,सुनील राठी, महावीर जांगीड, अतुल लढ्ढा, भास्करराव दानवे ,विजय जैन, मनीष तवरावाला ,सगीर अहमद,राजेश राऊत या यांच्यासह शहरातील उद्योजक, व्यापारी उपस्थित होते.