श्री गणेश सभेचा सर्वोत्कृष्ट धार्मिक व सामाजिक संस्था म्हणून गौरव

औरंगाबाद,६ मार्च / प्रतिनिधी :-श्री गणेश सभा या शहरातील नावाजलेल्या धार्मिक संस्थेला कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल व सतत चालू असणाऱ्या धार्मिक कार्याबद्दल अकोला येथील प्रसिद्ध नाथ शक्तीपीठ या संस्थेद्वारे दरवर्षी दिला जाणारा उत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार नुकताच महाशिवरात्रीच्या पावन प्रसंगी प्रदान करण्यात आला.

अकोला येथे नाथ शक्तीपीठाच्या सभागृहात प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराज यांचे हस्ते गौरवपत्र देण्यात आले. याप्रसंगी प. पू. नरेंद्रनाथ महाराजांनी श्री गणेश सभेने वरद गणेश मंदिराच्या माध्यमातून कोरोना काळात केलेल्या अन्नदानाची विशेष दखल घेतली व सर्व कार्यकारिणीने आपली सामाजिक जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली याबद्दल सर्व कार्यकारिणीचे अभिनंदन केले.

श्री गणेश सभेतर्फे अध्यक्ष मनोज पाडळकर यांनी कृतज्ञता व्यक्त करताना प. पू. नरेंद्रनाथ महाराज व नाथ शक्तीपीठाचे आभार मानले व इतक्या दूरही आपल्या कामाचे कौतुक झाले आणि यामुळे आणखी सामाजिक कार्य करण्यासा प्रोत्साहन मिळाले अशी भावना व्यक्त केली. श्री गणेश सभेतर्फे अध्यक्ष मनोज पाडळकर, सचिव अनिल देशमुख, उपाध्यक्ष अनिल वाळूजकर, सहसचिव सुनील खोचे, विश्वस्त निर्मला तरटे, सदस्य मयुरेश कोटणीस माजी सदस्या श्रीमती डॉ. शैलजा देव यांनी गौरवपत्राचा स्विकार केला.