पंतप्रधान 6 मार्च रोजी पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करणार

हा प्रकल्प पुण्यातील शहरी वाहतुकीसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल

पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण 

आर के लक्ष्मण आर्ट गॅलरी-संग्रहालयाचे उद्घाटन करणार

पुणे ,५ मार्च / प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च 2022 रोजी पुण्याला भेट देतील आणि पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करतील. तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही ते करणार आहेत.

सकाळी 11 वाजता पंतप्रधान पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. हा पुतळा 1850 किलोग्रॅम गन मेटलचा बनवलेला असून त्याची उंची सुमारे 9.5 फूट आहे.

Image

सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. पुण्यातील नागरी वाहतुकीसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प आहे. 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. एकूण 32.2 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 किमी लांब मार्गाचे  उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. हा संपूर्ण प्रकल्प 11,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला जात आहे. ते गरवारे मेट्रो स्थानकात प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पाहणी करतील आणि तिथून आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास करतील.

Image

दुपारी 12 वाजता पंतप्रधान अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाची पायाभरणीही ते करणार आहेत. नदीच्या 9 किमी पट्ट्यात 1080 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून पुनरुज्जीवन केले जाईल.  यामध्ये नदीकाठचे  संरक्षण, सांडपाणी व्यवस्थापन (इंटरसेप्टर सीवेज नेटवर्क), सार्वजनिक सुविधा, नौकाविहार सुविधा इत्यादी कामांचा समावेश असेल. मुळा-मुठा नदीचे  प्रदूषण कमी करणारा प्रकल्प 1470 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चासह  “एक शहर एक ऑपरेटर” या संकल्पनेवर राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 11 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधले जातील, त्यांची एकत्रित क्षमता सुमारे 400 एमएलडी असेल. बाणेर येथे  100 ई-बस आणि ई-बस डेपोचेही पंतप्रधान लोकार्पण करतील.

पुण्यात बालेवाडी येथे बांधण्यात आलेल्या आरके लक्ष्मण आर्ट गॅलरी-संग्रहालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या संग्रहालयाचे मुख्य आकर्षण म्हणजे मालगुडी गावावर आधारित छोटेखानी प्रतिकृती (मॉडेल) आहे जी ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून जिवंत केली जाणार आहे. व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांनी काढलेली व्यंगचित्रे संग्रहालयात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यानंतर, दुपारी 1:45 वाजता, पंतप्रधान सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ करतील.