युक्रेनच्या शेजारी देशांहून आतापर्यंत 13 हजार 700 हून अधिक भारतीय मायदेशी परत

मुंबई ,५ मार्च / प्रतिनिधी :- भारतीय नागरिकांच्या  सुटकेसाठी सुरु केलेल्या ‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेअंतर्गत युक्रेनच्या शेजारी देशातून आज 15 विशेष विमानांनी सुमारे 3000 भारतीयांना  मायदेशी परत आणण्यात आले. यामध्ये 12 विशेष नागरी विमाने आणि भारतीय हवाई दलाच्या 3 विमानांचा समावेश आहे. 22 फेब्रुवारी 2022 पासून सुरु करण्यात आलेल्या विशेष विमानांनी आतापर्यंत 13 हजार 700 भारतीयांना  मायदेशी परत आणण्यात आले आहे. आतापर्यंत 55 विशेष नागरी विमानांनी भारतात परत आणलेल्या भारतीयांची संख्या आता 11,728 झाली आहे. तर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी आतापर्यंत केलेल्या 10 फेऱ्यांतून  युक्रेनच्या शेजारी देशांसाठी 26 टन मदत साहित्य नेले आणि 2056 भारतीय नागरिकांना परत आणले.

Image
रुमानियातील बुखारेस्ट येथून भारतीय विद्यार्थी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आले.यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील विविध शहरातील विद्यार्थ्यी होते.

हवाई दलाच्या सी-17 या प्रकारच्या, अवजड माल वाहून नेऊ शकणाऱ्या 3 विमानांनी काल हिंडन हवाई तळावरून युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये जाण्यासाठी उड्डाण केले आणि ही विमाने आज सकाळी या तळावर परतली. या विमानांनी रुमानिया, स्लोव्हाकिया आणि पोलंड या देशांतून 629 भारतीय नागरिकांना परत आणले. या विमानांनी जाताना या देशांसाठी भारतातून 16.5 टन मदत सामग्री देखील नेली होती. एक नागरी विमान वगळता इतर सर्व नागरी विमाने आज सकाळी देशात परतली. कोशीचेहून निघालेले हे एक विमान आज संध्याकाळी उशिरा नवी दिल्ली येथे पोहोचेल असा अंदाज आहे. आज भारतीयांना मायदेशी घेऊन येणाऱ्या नागरी विमानांमध्ये बुडापेस्टहून येणाऱ्या 5, सुचावाहून येणाऱ्या 4, कोशीचेहून येणारे 1 आणि झेजोव्ह हून येणाऱ्या 2 विमानांचा समावेश आहे.

उद्या दिवसभरात 11 विशेष विमानांनी बुडापेस्ट,कोशीचे, झेजोव्ह आणि बुखारेस्ट या ठिकाणांहून 2200 हून अधिक भारतीयांना देशात परत आणण्यात येईल अशी अपेक्षा आहे.