भरधाव जीपच्या धडकेत सुरक्षारक्षक ठार ; वैजापूर – औरंगाबाद रस्त्यावरील घटना

वैजापूर ,५ मार्च / प्रतिनिधी :-भरधाव जीपच्या धडकेत सुरक्षा रक्षक ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता.3) रात्री औरंगाबाद – वैजापूर  रस्त्यावर रोटेगावजवळ घडली. जनार्धन विश्वनाथ तिवारी (रा.जयभवानीनगर, आघूर) असे मृताचे नाव आहे. ते रोटेगाव येथेच प्रशांत बोथरा यांच्या बांधकाम फर्ममध्ये सुरक्षारक्षक म्हणुन काम करत होते. 

जयभवानी नगर, आघूर येथील रहिवासी जनार्धन तिवारी हे रोटेगाव येथे बोथरा यांच्या बिल्डर डेव्हलपर्स फर्ममध्ये सुरक्षारक्षक म्हणून  काम करत होते. गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ते प्रशांत बोथरा यांना सांगून जेवण करण्यासाठी घराकडे निघाले. त्यावेळी रोटेगाव शिवारात हनुमान मंदिरासमोरील खंडाळा ते वैजापूर रस्त्यावर खंडाळ्याच्या दिशेने येणाऱ्या भरधाव जीपने त्यांना धडक दिली.

या घटनेत तिवारी हे गंभीर जखमी झाले. त्यावेळी प्रशांत बोथरा व त्यांचे मित्र केतन आव्हाळे, निलेश आव्हाळे, मनोज तिवारी व सागर राजपूत यांनी जखमी झालेल्या तिवारी यांना रस्त्याच्या बाजूस घेतले व त्यानंतर अपघात करुन पळ काढलेल्या जीपचा पाठलाग केला. वैजापूर शहरातील शास्त्रीनगर भागातील जोशी हॉस्पिटलजवळ त्यांनी जीपला पकडून पोलिसांना कळवले. जखमीस सरकारी दवाखान्यात दाखल केले असता डोक्याला व हातात पायाला गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. याप्रकरणी प्रशांत बोथरा यांच्या फिर्यादीवरुन जीप (एमएच १७ बी वाय ३५८७) चालक मोहसिन मनियार (रा. सुभाषनगर, कोपरगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.