‘सीबीएसई’चा इयत्ता 12 वी चा निकाल जाहीर; त्रिवेंद्रम विभागात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी सर्वाधिक
‘‘अनुत्तीर्ण” शब्दाऐवजी ‘‘पुन:प्रयत्नाची आवश्यकता’’ असा शब्दप्रयोग करण्याचा सीबीएसईचा निर्णय
नवी दिल्ली, 13 जुलै 2020

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने आज इयत्ता बारावीचा निकाल घोषित केला. या परीक्षेत त्रिवेंद्रम विभागातल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी सर्वाधिक आहे. या विभागातले 97.67 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल बंगलुरू विभागाचा निकाल 97.05 टक्के आहे. तर चेन्नई तिस-या स्थानावर असून या विभागाचा निकाल 96.17 टक्के आहे. या परीक्षेला एकूण 11,92,961 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 10,59,080 मुले उत्तीर्ण झाली आहेत. एकूण उत्तीर्ण मुलांचे प्रमाण 88.78 टक्के आहे. हे प्रमाण याआधीच्या वर्षीपेक्षा 5.38 टक्क्यांनी जास्त आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.15 टक्के आहे. कोरोरा प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या विशेष अपवादात्मक स्थितीत मंडळाने यावर्षी गुणवत्ता यादी जाहीर केली नाही.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली होती, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील कामगिरीच्या आधारावर गुण देण्यात आले होते.
सीबीएसई बारावी परीक्षा मंडळाने दि. 15 फेब्रुवारी ते 30मार्च 2020 या काळामध्ये इयत्ता बारावीची परीक्षा आयोजित केली होती. मात्र देशभरामध्ये कोविड-19 महामारीचा प्रसार झाल्यामुळे दि. 19 मार्च 2020 ते 30 मार्च 2020 या काळातल्या होणा-या 12 विषयांची तसेच उत्तर-पूर्व दिल्ली विभागातल्या 11 विषयांची परीक्षा रद्द करणे भाग पडले होते. या विषयांची परीक्षा नवीन वेळापत्रकाप्रमाणे 1 ते 15 जुलै 2020 या काळात घेण्यात येणार होती.

कोविड महामारीमुळे निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती आणि अनिश्चितता लक्षात घेवून तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि कल्याणाचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने दि. 26 जून,2020 रोजी मूल्यांकनाचे विशिष्ट निकष लावण्याच्या योजनेला आणि निकाल जाहीर करण्यास मान्यता दिली. त्यानुसार मूल्यांकनासाठी खालील निकष लावण्यात आले आहेत:-
मूल्यांकन योजना –
1. इयत्ता दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गाच्या विद्यार्थ्यांकरिता, ज्यांनी सर्व परीक्षा पूर्ण केली आहे, त्यांचे त्यांनी परीक्षेमध्ये ज्याप्रमाणे कामगिरी केली आहे, त्याआधारे त्यांचे निकाल जाहीर करण्यात यावेत.
2. ज्या विद्यार्थ्यांनी तीनपेक्षा जास्त विषयांची परीक्षा दिली आहे. त्या विद्यार्थ्यांनी ज्या तीन विषयात जास्त गुण मिळवले आहेत, त्यांची सरासरी घेवून त्या गुणांकनानुसार ज्या विषयाची परीक्षा त्यांनी दिलेली नाही, त्या विषयांना तितके गुण गृहित धरण्यात यावेत.
3. ज्या मुलांनी फक्त तीनच विषयांची परीक्षा दिली आहे, त्यांना ज्या दोन विषयात जास्त गुण मिळाले आहेत, त्या गुणांची सरासरी इतर अनुपस्थित राहिलेल्या विषयांना गुण देताना ग्राह्य धरावी.
4. एक किंवा दोन विषयांची परीक्षा देणारे इयत्ता बारावीचे अतिशय कमी विद्यार्थी आहेत. यामध्ये प्रामुख्याने दिल्लीची मुले आहेत. त्यांचे निकाल जाहीर करताना त्या मुलांचे विषयातले गुण आणि अंतर्गत, प्रॅक्टिकलचे गुण तसेच त्यांनी केलेले प्रकल्प यांचा आधार घेण्यात आला आहे. या मुलांना जर पुन्हा परीक्षा देण्याची इच्छा असेल तर त्यांची कार्यक्षमता सुधारण्याची संधी म्हणून सीबीएसईने वैकल्पिक परीक्षेमध्ये भाग घेण्याची अनुमती दिली आहे. तसेच इतर मुलांबरोबर त्यांचाही निकाल जाहीर करण्यात येईल,असे स्पष्ट केले आहे.**
वैकल्पिक परीक्षेची संधी
– ज्या विषयांच्या परीक्षा दि. 1 जुलै ते 15 जुलै 2020 या कालावधीत घेण्यात येणार होत्या, त्यांच्या वैकल्पिक परीक्षा कधी घेता येईल, याविषयी केंद्र सरकारशी चर्चा करून सीबीएसई निर्णय घेणार आहे.
– ज्या उमेदवारांचे निकाल मूल्यांकन योजनेचा आधार घेवून जाहीर करण्यात आले आहेत, त्या विद्यार्थ्यांना आपल्या निकालामध्ये सुधारणा करण्यासाठी वैकल्पिक परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे. या परीक्षेत उमेदवाराने मिळवलेले गुण हेच अंतिम गुण मानण्यात येतील.
** तथापि, या निकषांचा आधार घेवून 400 मुलांचा निकाल तयार करणे शक्य झाले नाही म्हणून त्यांचे निकाल आज जाहीर करण्यात आलेले नाहीत.
वैकल्पिक परीक्षेचे आयोजन
वैकल्पिक परीक्षेचे वेळापत्रक सरकारबरोबर चर्चा करून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
‘‘पुन:प्रयत्नाची आवश्यकता’’ असा शब्दप्रयोग
‘‘अनुत्तीर्ण’‘शब्दाचा करण्याऐवजी ‘‘पुन:प्रयत्नाची आवश्यकता’’ असा शब्दप्रयोग करण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. त्यामुळे मुलांच्या निकालपत्रामध्ये ‘अनुत्तीर्ण किंवा अयशस्वी’ अशी संज्ञा वापरण्यात येणार नाही. संकेतस्थळावर दिलेल्या निकालातही अयशस्वी ही संज्ञा असणार नाही.
डिजीलॉकरमध्ये प्रमाणपत्र
1. विद्यार्थ्यांना डिजिटल गुणपत्रिका मिळणार आहे. त्याचबरोबर या डिजीलॉकरमध्ये उत्तीर्ण आणि स्थलांतर प्रमाणपत्र, कौशल्य प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. या डिजीलॉकर खात्याचे अधिकारपत्र उमेदवारांना सीबीएसईकडे नोंदवलेल्या त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसमार्फत पाठवण्यात आले आहे.
- 2. मुलांना आपले प्रमाणपत्र या डिजीलॉकर मोबाईल अॅपवरून डाउनलोड करून घेता येणार आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.https://play.google.com/store/apps/details?id=com.digilocker.android)
तसेच अॅपल अॅप स्टोअर https://apps.apple.com/in/app/digilocker/id1320618078) प्रमाणपत्र घेता येणार आहे.
लॉगइन करण्यासाठी सीबीएसईकडे नोंदवलेला मोबाईलक्रमांक, ओटीपी वापरावा आणि आपल्या रोल नंबरचे शेवटचे सहा अंक सुरक्षा पिन म्हणून नोंदवण्यात यावा.