युक्रेनमध्ये अडकलेल्या 183 भारतीयांची तिसरी तुकडी मुंबईत

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मायदेशी परतलेल्या नागरिकांचे केले स्वागत

प्रवाशांच्या पुढच्या प्रवासाच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने विमानतळाच्या टी-2 टर्मिनलवर सुरु केला विशेष मदत आणि आरक्षण कक्ष

मुंबई,३ मार्च / प्रतिनिधी :-युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही विशेष मोहीम सुरु केली असून, या मोहिमेअंतर्गत 183 भारतीयांना घेऊन एअर इंडिया एक्सप्रेस IX 1202 हे विमान आज पहाटे मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. हे विमान तिथे अडकलेल्या प्रवाशांना घेऊन, रोमानियाच्या बुखारेस्ट इथून काल मध्यरात्री निघाले होते.

केंद्रीय रेल्वे आणि कोळसा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी विमानतळावर या प्रवाशांचे स्वागत केले. यावेळी या सर्व प्रवाशांचे नातेवाईक देखील विमानतळावर हजर होते.

या भारतीयांचे स्वागत केल्यावर दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ऑपरेशन गंगा अंतर्गत, युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.

सुमारे 17 हजार भारतीय, ज्यात बहुसंख्य विद्यार्थी आहेत, ते तिथे अडकले असून त्यापैकी सुमारे 4 ते 5 हजार नागरिकांना भारतात परत आणले गेले आहे, असे त्यांनी सांगितले. तिथे असलेल्या सर्व भारतीयांना मायदेशी परत आणेपर्यंत ही मोहीम सुरूच राहीलल, अशी माहितीही त्यांनी दिली.

परदेशातून मायदेशी येणाऱ्या प्रवाशांना आपापल्या गावी परत जाण्याची सोय करण्यासाठी भारतीय रेल्वेने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 वरच एक मदत आणि आरक्षण कक्ष स्थापन केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यनिहाय अशा या कक्षांद्वारे नागरिकांना त्यांच्या मूळगावी विनाकष्ट जाता यावे, या दृष्टीने त्यांना मदत केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी दानवे यांनी परत आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि या विद्यार्थ्यांची त्यांच्या गावी जाण्याची नीट सोय केली जावी अशा सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या. या विमानातून परत आलेल्या एका विद्यार्थिनीने युद्धग्रस्त भूमीतून सुटकेचे चित्तथरारक अनुभव सांगितले. या कठीण परिस्थितीत, भारतीय दूतावास आणि तिथल्या नागरी सहकारी संस्थांनी केलेल्या मदतीबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली. 

ऑपरेशन गंगा अंतर्गत उड्डाणे नुकतीच वाढवण्यात आली आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा नियंत्रण कक्ष तसेच युक्रेन, पोलंड, रोमानिया, हंगेरी आणि स्लोव्हाक इथे असलेल्या भारतीय दूतावासांचे नियंत्रण कक्ष 24 तास सुरु असून सर्व गरजू नागरिकांना आवश्यक ती मदत दिली जात आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्याशी काल दूरध्वनीवरुन संवाद साधला. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील स्थितीचे, विशेषतः खारकीवमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेविषयी चर्चा केली. भारतीय नागरिकांना युद्धजन्य प्रदेशातून सुरक्षित बाहेर काढण्याविषयी उभयतांमध्ये चर्चा झाली.