महाराष्ट्रातील ८७ विद्यार्थी आज युक्रेनमधून दिल्लीत दाखल; महाराष्ट्र सदनाद्वारे १२६ विद्यार्थी सुखरूप स्वगृही परतले

युक्रेनमधून 6200 हून अधिक भारतीय विशेष नागरी उड्डाणांद्वारे मायदेशी परतले

नवी दिल्ली ,३ मार्च / प्रतिनिधी :- गुरुवारी  सात  विशेष  विमानांनी  महाराष्ट्रातील ८७ विद्यार्थी युक्रेनमधून दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनाद्वारे गेल्या पाच दिवसांत १२६ विद्यार्थ्यांना सुखरूप स्वगृही पाठविण्यात आले आहे.

युद्धजन्य युक्रेन देशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारची ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरु आहे. देशातील अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांसह या मोहिमेंतर्गत २७ फेब्रुवारी २०२२च्या मध्यरात्रीपासून ते गुरुवार दुपारपर्यंत  विशेष  विमानांनी  महाराष्ट्रातील २४९ विद्यार्थी  दिल्लीत दाखल झाले आहेत.

थोडक्यात तपशील

एयर इंडियाच्या विशेष विमानाने २७ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन विशेष विमानांनी महाराष्ट्रातील ५८ विद्यार्थी दाखल झाले .२८ फेब्रुवारीला दोन विशेष विमानांनी १४ तर १ मार्च रोजी तीन विमानांनी २६ विद्यार्थी दाखल झाले. २ मार्च रोजी ५ विमानांनी ६४ विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले. तर ३ मार्च रोजी सर्वाधिक ७ विमानांनी ८७ विद्यार्थी युक्रेनमधून दिल्लीत दाखल झाले.

महाराष्ट्र सदनाद्वारे १२६ विद्यार्थी स्वगृही सुखरूप परत

युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे, यासाठी महाराष्ट्र सदनाचे  निवासी  आयुक्त तथा प्रधान सचिव समीरकुमार बिस्वास यांच्या नेतृत्वाखाली  २६ फेब्रुवारी २०२२ रोजी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला. दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजिकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी या कक्षाद्वारे विमानाचे तिकीट काढून देण्यात येत आहेत.

मुंबई येथे सर्वाधिक ७८ विद्यार्थी परतले

या विद्यार्थ्यांना राज्यातील महत्वाच्या विमानतळांद्वारे स्वगृही पोहचविण्यात येत असून आतापर्यंत सर्वाधिक ७८ विद्यार्थी मुंबईला परतले आहेत. पुणे येथे २३, नागपूर येथे १२ तर औरंगाबाद येथे ७ विद्यार्थी परतले आहेत. तीन विद्यार्थी नांदेडमार्गे मुंबई गेले तर दोन विद्यार्थी हैद्राबाद व एक विद्यार्थी गोव्याहून महाराष्ट्रात स्वगृही सुखरूप पोहचला आहे.

महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र शासनासोबत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत.

दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षाद्वारे विमानतळाहून महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना उपलब्धतेनुसार विमानाद्वारे  सुखरुप  स्वगृही  पोहचविण्यात येत आहे. महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षामध्ये एकूण २५  अधिकारी-कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत.

युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांना आपापल्या राज्यात सुखरुप पोहोचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

दोन दिवसांत 7400 हून अधिक भारतीय दाखल होण्याची शक्यता

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन गंगा’ नावाने  मोठी बचाव मोहीम राबवली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या निकट समन्वयाने, परराष्ट्र मंत्रालय भारतीय विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी सर्वतोपरी  प्रयत्न करत आहे. इंडियन एअरलाइन्स देखील या बचाव मोहिमेत  हातभार लावत आहे . चार केंद्रीय मंत्री-  हरदीप सिंग पुरी,  ज्योतिरादित्य एम सिंधिया,  किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्ही.के. सिंग युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये जाऊन या मोहिमेला मदत आणि देखरेख ठेवण्यासाठी गेले  आहेत. भारतीय नागरी विमाने तसेच भारतीय हवाई दलाची विमाने  अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत घेऊन येत आहेत .

22 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या बचाव कार्याअंतर्गत   आतापर्यंत 6200 हून अधिक लोकांना परत आणले आहे, ज्यात 10 विशेष नागरी विमानांद्वारे आज येत असलेल्या 2185 व्यक्तींचा समावेश आहे. आजच्या उड्डाणांमध्ये बुखारेस्टहून(रुमानिया) 5, बुडापेस्टहून(हंगेरी) 2, कोसिसहून(स्लोवाकिया) 1 आणि  झेझोहून(पोलंड) 2 विमानांचा समावेश होता. याशिवाय,भारतीय हवाई दलाची  3 विमाने आज आणखी काही  भारतीयांना घेऊन येत आहेत. नागरी उड्डाणांची संख्या आणखी वाढवली जाईल आणि पुढील दोन दिवसांत विशेष विमानांद्वारे 7400 हून अधिक लोकांना मायदेशी आणले जाण्याची शक्यता आहे. उद्या 3500 आणि 5 मार्च रोजी 3900 हून अधिक लोकांना परत आणले जाण्याची शक्यता आहे.

ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमधून 200 विद्यार्थी आणि भारतीय नागरिक सुखरूप

रसायन आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा, यांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मायदेशी परतलेल्यांचे  स्वागत केले, यापैकी बहुतेक विद्यार्थी होते. इंडिगोचे विशेष विमान आज सकाळी दिल्लीत दाखल झाले.
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार युक्रेनमधून सर्व भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी वचनबद्ध आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी सुखरूप मायदेशी परतलेल्यांचे स्वागत करताना सांगितले.

त्यांनी विद्यार्थ्यांना, त्यांचे मित्र आणि सहकाऱ्यांनाही लवकरच युक्रेनमधून बाहेर काढले जाईल, असे आश्वासन दिले.

भारतात परत आल्यावर कुटुंबियांची भेट झाल्याबद्दल  विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारप्रति कृतज्ञता व्यक्त केली. विमानातील एका तरुण विद्यार्थ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, तो म्हणाला, युद्धग्रस्त देशातून सुरक्षित बाहेर काढणे हा केवळ चमत्कार नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते शक्य करून दाखवले.
 


इंडिगो विमानाने इस्तंबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी रात्री 10.35 वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार)  उड्डाण केले आणि आज सकाळी 8.31 वाजता नवी दिल्लीला पोहोचले.

एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि स्पाइसजेट, ऑपरेशन गंगा मोहिमेत सामील झाले असून युक्रेनच्या शेजारील देशांमधून दिल्ली आणि मुंबईला प्रवासी उड्डाणे करत आहेत.