औरंगाबाद बाजार समिती आणि प्रशासक मंडळाला औरंगाबाद खंडपीठाची नोटीस

औरंगाबाद,३ मार्च / प्रतिनिधी :-उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीवर नियुक्त प्रशासक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतरसुद्धा कार्यरत असल्याने औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर खंडपीठाने बाजार समिती आणि प्रशासक मंडळाला नोटीस बजावली आहे. प्रशासक मंडळाची मुदत २३ फेब्रुवारीला संपली आहे.

औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीवर २२ जुलै २०२१ रोजी प्रशासक मंडळाची नियुक्ती सहा महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात आली होती. या मंडळाची मुदत २३ फेब्रुवारी रोजी संपली आहे. मंडळाच्या विरुद्ध बाजार समितीमधील अनियमिततेबाबत सहकारमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशी सुरू आहे. त्यामुळे पणन संचालक, पुणे व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, औरंगाबाद यांनी शासन आदेशानुसार प्रशासक मंडळाच्या सदस्यांना मुदतवाढ दिलेली नाही. तरीसुद्धा बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठ यांनी प्रशासक मंडळाला बाजार समितीवर कार्य करण्यास थांबविले नाही. सचिवांनी १८ फेब्रुवारी २०२२ रोजी मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा घेतली होती. कार्यकाळ संपलेला असताना व वाढीव मुदत नसताना प्रशासक मंडळ बेकायदेशीर काम करत असल्याची याचिका दिलावर मिर्जा बेग यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. सुनावणीअंती न्या. संजय गंगापूरवाला व एस. जी. दिगे यांनी बाजार समितीला व प्रशासक मंडळाला नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी पाच एप्रिल रोजी होणार आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने मोहम्मद असीम यांनी बाजू मांडली.