फेब्रुवारी 2022 मध्ये एकूण 1,33,026 कोटी रुपये जीएसटी महसूलाचे संकलन

Displaying Mane.jpg

मासिक जीएसटी महसूल संकलनाने पाचव्यांदा ओलांडला 1.30 लाख कोटी रुपयांचा टप्पा

फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्राच्या जीएसटी संकलनात 21% तर गोव्याच्या जीएसटी संकलनात 6% ची वाढ

नवी दिल्ली ,१ मार्च / प्रतिनिधी :- फेब्रुवारी 2022 महिन्यात जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करापोटी एकूण 1,33,026 कोटी रुपये महसूल संकलित करण्यात आला आहे. यामध्ये सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 24,435 कोटी रुपये, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 30,779 कोटी रुपये, आयजीएसटी Rs 67,471 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवरील करापोटी जमा झालेले 33,837 कोटी रुपये धरून) आणि अधिभार 10,340 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवरील करापोटी संकलित झालेले 638 कोटी रुपये धरून) यांचा समावेश आहे.

सरकारने नियमित सामंजस्य म्हणून आयजीएसटीमधून 26,347 कोटी रुपये सीजीएसटीला आणि 21,909 कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत. सर्व देणी दिल्यानंतर, फेब्रुवारी 2022 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारांना अनुक्रमे सीजीएसटीपोटी 50,782 कोटी रुपये आणि एसजीएसटीपोटी 52,688 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे.

गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात संकलित झालेल्या जीएसटी महसुलापेक्षा फेब्रुवारी 2022 मध्ये 18% अधिक महसूल गोळा झाला आहे तर फेब्रुवारी2020 मधील जीएसटी संकलनापेक्षा या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 26% अधिक जीएसटी संकलित झाला आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये आयात केलेल्या वस्तूंवरील करापोटी 38% अधिक महसूल जमा झाला असून देशांतर्गत व्यवहारांमधून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल गेल्या वर्षी याच महिन्यात याच स्त्रोतांद्वारे संकलित महसुलापेक्षा 12% अधिक आहे.

फेब्रुवारी हा 28 दिवसांचा महिना आहे त्यामुळे दर वर्षीच या महिन्यातील जीएसटी संकलन जानेवारी महिन्यापेक्षा नेहमीच कमी असते हे लक्षात घेतले पाहिजे. या वर्षी 20 जानेवारीच्या दरम्यान देशात आलेल्या ओमायक्रॉन विषाणू संसर्गाच्या लाटेमुळे विविध ठिकाणी लावावी लागलेली अंशतः टाळेबंदी, सप्ताहाच्या शेवटी तसेच रात्री लागलेली संचारबंदी आणि लागू झालेले  इतर प्रतिबंधात्मक नियम या संदर्भात हे फेब्रुवारी महिन्यातील जीएसटी संकलनातील वाढ लक्षात घ्यायला हवी.

या वर्षात पाचव्यांदा मासिक जीएसटी संकलनाच्या आकडेवारीने 1.30 लाख कोटींचा टप्पा पार केला आहे. देशात जीएसटी लागू झाल्यापासून पहिल्यांदाच जीएसटी अधिभार संकलनाने 10,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.यातून अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये आर्थिक व्यवहार विशेषतः वाहन उद्योगातील विक्री पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मिळत आहेत.

फेब्रुवारी 2021 मध्ये महाराष्ट्रात 16,104 कोटी रुपये तर गोव्यात 344 कोटी रुपये जीएसटी महसूल संकलन झाले होते, तर फेब्रुवारी 2022 मध्ये महाराष्ट्रात 19,423 कोटी रुपये तर गोव्यात 364 कोटी रुपये जीएसटी महसुलाचे संकलन झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत या वर्षी फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्राच्या जीएसटी महसूल संकलनात  21%  तर गोव्याच्या महसूल संकलनात 6%ची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.