शेतकऱ्यांकडे वीजबिलांपोटी २६४२ कोटी रुपयांची सुधारित थकबाकी

कृषी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी उरला केवळ एक महिना

औरंगाबाद ,१ मार्च / प्रतिनिधी :- राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० नुसार कृषिपंपाच्या वर्षानुवर्ष थकीत असलेल्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी आता केवळ एक महिना उरला आहे. थकबाकीची ५० टक्के रक्कम व पूर्ण चालू वीजबिल येत्या ३१ मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कमही माफ करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता योजनेत आजच सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Displaying Dr.Nitin-Raut.jpg
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

         कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी औरंगाबाद परिमंडलातील ३ लाख ५५ हजार ७८२ शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील व्याज व विलंब आकारातील सूट, वीजबिल दुरुस्ती समायोजन तसेच महावितरणकडून निर्लेखनाचे एकूण १८१८ कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे वीजबिलांपोटी २६४२ कोटी रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यापैकी ५० टक्के थकबाकी तसेच सर्व चालू वीजबिलांचा येत्या ३१ मार्चपर्यंत भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के म्हणजे तब्बल १३२१ कोटी रुपयांची माफी शेतकऱ्यांना मिळणार आहे. दरम्यान, ज्या शेतकर्‍यांची वीजबिलांबाबत तक्रार किंवा शंका असेल त्याचे तातडीने निराकरण करावे व या योजनेचा लाभ सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना करून देण्यासाठी तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देश अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.

Displaying vijay-singhal.jpg
महावितरण व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल

कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेला सध्या चांगला प्रतिसाद मिळत असून औरंगाबाद परिमंडलात आजपर्यंत १ लाख ३१ हजार ६२८ शेतकऱ्यांनी चालू वीजबिल व थकबाकीची काही रक्कम भरून सहभाग घेतला आहे. त्यांना आतापर्यंत व्याज, दंड, निर्लेखनासह भरलेल्या रकमेएवढीच एकूण ५१३ कोटी ७१ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. या शेतकऱ्यांनी सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रकमेमधील शिल्लक रक्कम येत्या ३१ मार्चपर्यंत भरल्यास त्यांचीही उर्वरित ५० टक्के थकबाकी संपूर्ण माफ होणार आहे. त्याप्रमाणे आतापर्यंत सुधारित थकबाकीची एकूण ५० टक्के रक्कम व चालू वीजबिल भरून परिमंडलातील ३ हजार ६८२ शेतकऱ्यांनी वीजबिल संपूर्णपणे कोरे केले आहे.

कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार कृषी वीजबिलांच्या चालू व थकीत बिलांच्या वसुलीतील ६६ टक्के रकमेचा कृषी आकस्मिक निधी हा ग्रामपंचायत (३३ टक्के) आणि जिल्हा स्तरावर (३३ टक्के) कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याप्रमाणे आतापर्यंत परिमंडलात ८६ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. यामध्ये प्रत्येकी २८ कोटी ६५ लाख रुपयांची निधी हा ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रातील वीजयंत्रणेच्या विकास कामांसाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या, योग्य दाबाने व सुरळीत वीजपुरवठ्यासह स्थानिक वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाला वेग मिळाला आहे. आतापर्यंत परिमंडलात ४ हजार ५०१ कृषिपंपांना नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. तर कृषी आकस्मिक निधीमधून आतापर्यंत १६ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या ९१७ वीज यंत्रणेच्या विविध कामांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. त्यातील ४९१ कामांचे कार्यादेश देण्यात आले असून ४१८ कामे प्रगतीपथावर आहेत तर ७३ कामे पूर्ण झाली आहेत.         

सुधारित थकबाकीमध्ये आणखी ५० टक्के माफी मिळविण्याची संधी येत्या ३१ मार्च २०२२ पर्यंत असल्याने कृषिपंपधारक शेतकऱ्यांनी सुधारित थकबाकीसह आपली सर्व चालू वीजबिले भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांनी केले आहे.