छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण?, सुप्रिया सुळेंकडून पवारांचा व्हिडीओ ट्विट; राज्यपालांना दिले उत्तर

मुंबई ,२८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पुछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा, गुरू का बडा महत्त्व होता है, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारीयांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात केलं. राज्यपालांच्या या विधानाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार… ‘तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे आदरणीय पवार साहेबांनी शरद स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. ते म्हणतात,“जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं… रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. शिवाजी महाराजांच्या गुरु राजमाता जिजामाता होत्या, असं सांगणारा शरद पवारांचा व्हिडीओ सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून राजामाता जिजाऊ याच शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे गुरु कोण? हा वाद पुन्हा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

सुप्रिया सुळे यांनी एकूण पाच ट्विट केले आहेत. व्हिडीओ आणि कोर्टाच्या निर्णयाची कॉपीही सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. 16 जुलै 2018 रोजी दिलेल्या निकालानुसार… ‘तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही.’ असं सुप्रिया सुळे यांनी कोर्टाची कागदपत्रं पोस्ट करत म्हटलं आहे.

अवमान करणारे ‘छिंदम’ प्रवृत्तीचे हे सर्व लोक एकाच पक्षातून-राष्ट्रवादी काँग्रेस

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी श्री समर्थ साहित्य संमेलनात बोलत असताना “समर्थांशिवाय शिवाजीला कुणी विचारले असते?” असा उल्लेख करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला.

भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्त्व आहेच. पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु समर्थ रामदास नाहीत, हे वारंवार इतिहासकारांनी स्पष्ट करुन सांगितले आहे. तरीही समर्थ रामदास स्वामींना छत्रपतींचा गुरु म्हणून उल्लेख करुन लोकांचा बुद्धिभेद करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु आहे.याआधी देखील छत्रपती शिवरायांचा अवमान कधी लेखणीतून, कधी वाणीतून तर कधी कृतीतून झालेला आहे. विशेष म्हणजे अवमान करणारे ‘छिंदम’ प्रवृत्तीचे हे सर्व लोक एकाच पक्षातून येतात. या पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा एवढा राग का येत असावा? राजमाता जिजाऊ या शिवरायांच्या गुरु आहेत, असे इतिहासकार आणि छत्रपतींचे वंशज वारंवार सांगत आहेत. तरीही या पक्षाचे लोक हे वारंवार जाहीर व्यासपीठांवरून का नाकारत आहेत? एका महिलेचे कर्तृत्व नाकारण्याची ही ‘संघी’ विचारधारा आपल्यावर का थोपवली जात आहे? असे एक ना अनेक प्रश्न आज महाराष्ट्राला सतावत आहेत. या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन अभ्यासपूर्ण पद्धतीने महाराष्ट्राचा खरा इतिहास आणि सन्मान टिकवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

समर्थ रामदास यांचा संबंध जोडणे आवश्यक नव्हतेराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा समर्थ रामदासांसोबत दूरान्वये संबंध नव्हता. मात्र छत्रपती शिवाजी महाराज हे ‘समर्थ’ कसे झाले व कुणामुळे झाले? हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न महाराष्ट्राच्या राज्यपालांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरु राजमाता जिजाऊ होत्या. त्यांनी छत्रपतींना घडवले, सर्व ज्ञानाचे धडे दिले. असे असताना समर्थ रामदास यांचा संबंध जोडणे आवश्यक नव्हते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांचा इतिहास नीट वाचला असता तर आम्हाला आनंद झाला असता, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी माध्यमांशी बोलताना लगावला आहे.

…अन्यथा धोतर फेडू!-विनोद पाटील

काल राज्याचे राज्यपाल यांनी नविन जावईशोध लावला. पदावर आहात, ज्येष्ठ आहात म्हणून मुलाहिजा करतो. छत्रपती शिवरायांबद्दल भावना, संवेदना नसतील, तर त्याविषयी बोलताना नको त्या विषयात नाक खुपसू नये. आपले छत्रपतींविषयीचे खरे विचार काल आपसूक बाहेर आले. आपलं वय आणि वक्तव्य बघता तुम्हाला निवृत्तीची गरज आहे, असे आम्हाला वाटते.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी आवाहन करतो की तात्काळ या बदफैली राज्यपालांची उचलबांगडी करावी व छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी. अन्यथा आम्ही सर्व शिवभक्त आपले धोतर फेडण्यास मागेपुढे पाहणार नाही.