कोरोनामुळे वाढत चाललेला मृत्यूचा दर कमी झालाच पाहिजे – पालकमंत्री टोपे

जालना   दि. 13 :-  जालना जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे मृत्यूचा दर वाढला असून ही अतिशय चिंतेची बाब आहे. जिल्ह्यातील हा मृत्यूदर कमी झालाच पाहिजे यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच खाजगी डॉक्टरांनी कोविड रुग्णालयात त्यांची सेवा देणे बंधनकारक केले असल्याची माहिती आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व शासकीय वैद्यकीय अधिकारी तसेच खाजगी डॉक्टर यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री श्री.टोपे बोलत होते.

यावेळी आरोग्य सभापती कल्याणराव सपाटे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्‍हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, संचालक आरोग्य सेवा पुणे श्रीमती अर्चना पाटील, महात्मा  ज्योतिबा फुले जन आरोग्य विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, उपसंचालक आरोग्य डॉ. लाळे, आसीएमआरचे सदस्य डॉ.  सुभाष साळुंके,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड,डॉ. संजय राख, डॉ. बळीराम बागल, डॉ. मोजेस, डॉ. प्रदीप हुसे, डॉ. साबळे,  डॉ. जेथलिया,डॉ. आदिनाथ पाटील,डॉ. रितेश अग्रवाल यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री. टोपे म्हणाले,  कोरोनामुळे बाधित झालेल्या  व्यक्तींचे  लवकर निदान  झाल्यास  त्यांच्यावर तातडीने उपचार करणे शक्‍य होऊन यामुळे मृत्यूचा  दर निश्चितच कमी होईल. यासाठी केवळ अर्ध्या तासांमध्ये अहवाल देणाऱ्या अँटिजेन तपासण्या वाढविण्यात येत असून जिल्ह्यातील नामांकित असलेल्या खासगी दवाखान्यातील डॉक्टरांनी त्यांची सेवा सात दिवस कोविड रुग्णालयास देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कोविड बाधितांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना रेमडिसिव्हिर औषधा बरोबरच पीपीई किटही उपलब्ध करून देण्यात येत आहेत.  जालना शहरामध्ये सध्या लॉकडाऊन सुरू असून यामुळे कोरोना विषाणूची साखळी तुटण्यास मदत होणार असल्याचे सांगत रुग्णांचा शोध, तपासणी व उपचारावरही भर देण्यात येत असून येणाऱ्या काळात जालन्यामध्ये कोरोना बाधितांचा वाढत चाललेला आकडा व मृत्युदरही निश्चित कमी होईल, असा विश्वासही पालकमंत्री श्री .टोपे यांनी यावेळी व्यक्त केला.

जालना शहरामध्ये ज्यांना मधुमेह, हृदयरोग यासारखे आजार असलेल्या  60 वर्षावरील 13 हजार व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यांचे ब्लड प्रेशर, ऑक्सिजनची पातळी, रक्तामधील साखरेचे प्रमाण दैनंदिन तपासणीसाठीचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असल्याचे सांगत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये जिल्ह्यातील 3 ते 4 रुग्णालयाचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती देत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शहरातील स्त्री रुग्णालयाच्या सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधीही मंजूर करण्यात येणार असल्याचे श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *