युक्रेनमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील ७२ विद्यार्थी आतापर्यंत दिल्लीत दाखल

महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षाद्वारे ४६ विद्यार्थी स्वगृही सुखरूप परतले

युक्रेनमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील ७२ विद्यार्थी आतापर्यंत दिल्लीत दाखल

नवी दिल्ली ,२८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- युद्धजन्य युक्रेन देशात अडकलेले महाराष्ट्रातील एकूण ७२ विद्यार्थी आतापर्यंत पाच विशेष विमानांनी दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनाद्वारे स्थापन सहकार्य कक्षाच्या माध्यमातून यातील ४६ विद्यार्थ्यांना सुखरूप स्वगृही पाठविण्यात आले आहे.

सद्या युक्रेनमध्ये युद्ध सुरु असून तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याची भारत सरकारची ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरु आहे. या मोहिमेंतर्गत रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी सायंकाळपर्यंत एकूण पाच विमानांद्वारे जवळपास १२५० भारतीय विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले असून यात महाराष्ट्रातील ७२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

थोडक्यात तपशील

एयर इंडियाच्या विशेष विमानाने बुखारेस्ट (रोमानिया) येथून रविवारी मध्यरात्री दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले विशेष विमान दाखल झाले. यात, महाराष्ट्रातील २८ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यानंतर, रविवारी सकाळी आणि सायंकाळी अशा दोन विशेष विमानांनी महाराष्ट्रातील प्रत्येकी १८ आणि १२ विद्यार्थी दाखल झाले. सोमवारी  सकाळी  आणि सायंकाळी अशा दोन विशेष विमानांनी  प्रत्येकी १० आणि ४ विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले आहेत.

महाराष्ट्र सदनाद्वारे४६विद्यार्थी स्वगृही सुखरूप परत

युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुखरुप स्वगृही पोहोचता यावे, यासाठी महाराष्ट्र सदनाचे  निवासी  आयुक्त तथा प्रधान सचिव समीरकुमार बिस्वास यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. सदनाच्या अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र शासनासोबत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत. या कक्षाद्वारे गेल्या दोन दिवसात  ४६ विद्यार्थ्यांना सुखरूप स्वगृही पाठविण्यात आले आहे.

सहकार्य कक्षामध्ये एकूण२५अधिकारी-कर्मचारी अहोरात्र कार्यरत

महाराष्ट्र सदनाद्वारे दिल्ली विमानतळावर स्थापन सहकार्य कक्षात ५ अधिकारी- कर्मचारी तर ५ वाहन चालक कार्यरत आहेत. विमानतळाहून महाराष्ट्र सदनामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सहकार्य करण्यासाठी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १२ कर्मचारी कार्यरत आहेत.

सहकार्य कक्षाद्वारे असे सुरु आहे कार्य

दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्यस्थळी पोहोचविण्यासाठी या कक्षाद्वारे विमानाचे तिकीट काढून देण्यात येत आहे. विमानतळाहून कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना उपलब्धतेनुसार विमानाद्वारे  सुखरुप  स्वगृही  पोहोचविण्यात येत असून आतापर्यंत ४६ विद्यार्थी सुखरूप स्वगृही परतले आहेत.

युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांना आप-आपल्या राज्यात सुखरुप पोहोचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ‘ऑपरेशन गंगा’ चा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘ऑपरेशन गंगा’ च्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक झाली. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी कालपासून ‘ऑपरेशन गंगा’ या नावाने मोहीम सुरु करण्यात आली आहे. तिथे अडकलेले सर्व भारतीय नागरिक सुरक्षित रहावेत, यासाठी सरकारची संपूर्ण यंत्रणा अहोरात्र काम करत आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

पंतप्रधानांचे विशेष दूत म्हणून चार वरिष्ठ मंत्री युक्रेनजवळच्या  विविध देशात गेले असून, त्यांच्या प्रत्यक्ष तिथे जाण्याने नागरिकांना मायदेशी परत आणण्याच्या मोहिमेला मोठे बळ मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यातून, या मुद्द्याला भारत सरकारने दिलेले प्राधान्यही अधोरेखित होत आहे, असे त्यांनी सांगितले.

युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या मानवतावादी संकटाचा सामना करण्यासाठी भारताने पाठवलेल्या मदतीची पहिली खेप उद्या पाठवली जाईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

‘वसुधैव कुटुंबकम’ हा भारताचा मूलमंत्र असून, भारत, आपल्या शेजारील राष्ट्रांना तसेच विकसनशील देशांनाही गरज पडल्यास, युक्रेनमधल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती मदत करेल, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.