बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी ; वैजापूर तालुक्यातील लाडगाव जवळील घटना

वैजापूर ,२८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-दुचाकीवर जाणाऱ्या तिघांवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याने महिला गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील लाडगांव- कापूसवाडगाव रस्त्यावर घडली. वीणाताई परशुराम मुंडे (47) रा.कापूसवाडगांव असे जखमी महिलेचे नाव असून बिबट्याने त्यांच्या हाताचे लचके तोडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर वैजापूर येथील आधार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

तालुक्यातील कापूसवाडगाव येथील रहिवासी परशुराम मोहिनीराज मुठे हे पत्नी वीणाबाई व मुलगा गणेश यांच्यासह दुचाकीवर लाडगाव येथून कापुसवाडगावकडे जात होते. लाडगाव येथे त्यांचे सायकलचे दुकान असून ते शेतीही करतात. रविवारी रात्री सात वाजता दुकान बंद करुन ते घराकडे निघाले. मुलगा गणेश हा दुचाकी चालवत होता व पती पत्नी पाठीमागे बसले होते. लाडगाव येथून पुढे गेल्यानंतर रक्ते शिवारातील ओढ्यात त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. हा बिबट्या दुचाकी समोरुन बाजुच्या शिवारात गेल्याने मुठे कुटुंबियांना हायसे वाटले. पण थोडे अंतर पुढे गेल्यानंतर या बिबट्याने पाठीमागून येऊन वीणाबाई यांच्यावर हल्ला करुन त्यांना खाली ओढले. त्यामुळे दुचाकीवरील तिघेही खाली पडले.  बिबट्याने वीणाबाई यांना पकडून त्यांचे लचके तोडले. त्यामुळे त्यांच्या हाताला गंभीर इजा झाली. परशुराम यांनी ऊठुन आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने धुम ठोकली.

जखमी महिलेला तातडीने वैजापूर येथील डॉ‌. ईश्वर अग्रवाल यांच्या आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. या घटनेमुळे लाडगांव- कापुसवाडगाव व परिसरातील गावांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.