वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांसाठी 46 लाख 60 हजार रुपयांचे अनुदान

वैजापूर ,२७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांसाठी समग्र शिक्षाअंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक 2021-22 मध्ये 46 लाख 60 हजार 500 रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांच्या आदेशाने पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे हे अनुदान वितरित करण्यात आले आहे.शाळांना मिळणारे अनुदान खर्च करण्यासाठी काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत.शाळेतील नादुरुस्त भौतिक वस्तू दुरुस्त करणे , खेळाचे साहित्य, क्रीडा  साहित्य, विज्ञान प्रयोगशाळा साहित्य खरेदी, शाळेचे वीज बील, पाण्याची सुविधा,शैक्षणिक साहित्य निर्मिती,वर्ग अध्यापन,शाळा इमारत देखभाल, स्वछतागृहांची  दुरुस्ती आणि इतर भौतिक सुविधा सुस्थितीत ठेवण्यासाठी हे अनुदान खर्च करावयाचे आहे.केंद्र सरकारच्या स्वछताविषयक मोहिमेच्या अनुषंगाने ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ या संकल्पनेचा उद्देश अधिक दृढ होईल.विद्यार्थ्यांसाठी स्वछतागृहाच्या सुव्यवस्थेसाठी मंजूर असलेला निधी या नियोजित उपक्रमावर खर्च करण्यात यावा असे स्पष्ट करण्यात आले आहे.