युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी साधला संवाद

नवी दिल्ली ,२६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधून चर्चा केली.

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षमय परिस्थितीबद्दल राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधानांना तपशीलवार माहिती दिली. सध्या सुरु असलेल्या संघर्षामुळे झालेल्या जीवित आणि वित्त हानीबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केले. हिंसाचार त्वरित थांबवावा आणि संवादातून मार्ग काढावा या आवाहनाचा त्यांनी पुनरुच्चार केला आणि शांतता प्रस्थापित करण्याचा  प्रयत्नांसाठी कोणत्याही प्रकारे योगदान देण्याची भारताची तयारी दर्शवली.

पंतप्रधानांनी युक्रेनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबद्दल आणि सुरक्षिततेबाबत  भारताची चिंता व्यक्त केली. युक्रेनमधून भारतीय नागरिकांना त्वरीत आणि सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी युक्रेन प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली.