लातूर जिल्ह्यात लॉकडाऊनची प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी-पालकमंत्री अमित देशमुख

  • आरोग्य विभागाने लातूर जिल्ह्याचा आरोग्याचा विशेष आराखडा तयार करून त्वरित सादर करावा
  • जिल्हा प्रशासनाने लॉक डाऊन च्या काळात सुलभ पद्धतीने पिक विमा भरण्याची सुविधा उपलब्ध करावी
  • जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन ची अत्यंत कडक अंमलबजावणी करावी,
  • सर्व लोकप्रतिनिधीचे प्रशासनाला संपूर्ण सहकार्य राहील
  • जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किमान पाच बेडची ICU सुविधा निर्माण करावी
  • जिल्ह्यात वेंटिलेटर व औषधीचा मुबलक साठा उपलब्ध
  • आमदार निधीतून थर्मल गन व ऑक्सि मिटर घेण्यासाठी परवानगी

लातूर, दि.13:- जिल्ह्यात covid-19 चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 15 जुलै ते 30 जुलै 2020 या कालावधीत लॉक डाउन जाहीर करण्यात आलेला आहे. तरी जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाने या लॉकडाऊन ची अत्यंत कडक अंमलबजावणी करून covid-19 चा प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी अत्यंत तत्परतेने प्रयत्न करावेत, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित लातूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते. यावेळी संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे, रमेशआप्पा कराड, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार धीरज देशमुख, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, अधिष्ठता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने लॉक डाउनच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी हो covid-19 चा प्रादुर्भाव कमी करून हा लॉक डाऊन यशस्वी करावा. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांचा लॉकडाऊन कालावधीत प्रशासनाला संपूर्ण सहकार्य राहील, असे त्यांनी सांगितले. प्रशासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी ग्रामीण पातळीपर्यंत सुलभ सुविधा उपलब्ध करून द्यावी व जिल्ह्यातील एकही शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले. त्याप्रमाणेच जिल्ह्याच्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील मोठ्या गावांमधील लोकांचीही आरोग्य तपासणी करावी तसेच मोठ्या गावांमध्ये ही लॉकडाऊन ची कडक अंमलबजावणी होईल याची खबरदारी घ्यावी असेही त्यांनी निर्देशित केले.

आरोग्य विभागाने स्वाब टेस्टिंगची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवावी. तसेच पूल टेस्टिंग व रॅपिड टेस्टिंग घेण्यास सुरुवात करावी. जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक असलेला औषधींचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तसेच पुढील काळात केंद्र व राज्य शासनाकडून ज्या औषधी उपलब्ध होणार आहे त्यातील आवश्यक तेवढा औषधी लातूर जिल्ह्यासाठी उपलब्ध असतील अशी ग्वाही पालकमंत्री देशमुख यांनी दिली. तर आरोग्य विभागाने कोविड च्या अनुषंगाने जिल्ह्याच्या आरोग्याचा सविस्तर आराखडा तयार करून त्वरित सादर करावा असेही सूचना त्यांनी केली. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी किमान आय सी यु सुविधा असलेले पाच बेड निर्माण करावेत. आरोग्य यंत्रणेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असून व्हेंटिलेटर व इतर आवश्यक साहित्य मुबलक आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी खाजगी रुग्णालय सुरू ठेवणाऱ्या संबंधित रुग्णालयावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देशमुख यांनी दिले. तसेच आमदारांच्या विकास निधीतून थर्मल गन व ऑक्सीमीटर खरेदी करण्यास ही त्यांनी परवानगी दिली.

जिल्ह्यातील प्रत्येक कंटेनमेंट झोन अधिक सक्षम करून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणावर करावे.जिल्हा प्रशासनाने आवश्यकतेनुसार खाजगी डॉक्टर यांच्या सेवा उपलब्ध करुन घ्याव्यात. त्याप्रमाणेच खासगी रुग्णालयातून covid-19 उपचार सुरू करण्याबाबत संबंधित रुग्णालयाशी चर्चा करावी असे निर्देश श्री देशमुख यांनी दिले. जिल्हास्तरावर निर्माण करण्यात आलेल्या टास्क फोर्स ची आठवड्यातून किमान एक बैठक आयोजित करावी त्याप्रमाणेच प्लाजमा डोनेशन बँक हि सुरु करावी, असे ही त्यांनी सूचित केले.

यापुढील काळात जिल्ह्यात होणाऱ्या लग्न समारंभावर प्रशासनाने लक्ष ठेवावे. सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालावी. जिल्ह्यातील नागरिकांचे चेहऱ्यावर मास्क घालणे, नियमित हँडवॉश करणे व भौतीक अंतराचे पालन करणे याबाबत प्रशासकीय स्तरावरून योग्य ते प्रबोधन करावे. कारण कोणाचा हा विषाणू कधीपर्यंत राहील याची कोणालाही खात्री नाही त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगून covid-19 विरोध आपला लढा सुरूच राहणार आहे. हा लढा रुग्णालयात पेक्षा रूग्णालयाच्या बाहेरच आले लढला पाहिजे. या लढ्यासाठी शासन, लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एकत्रित येऊन मात करण्याचा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील मोठे खाजगी रुग्णालयात covid-19 च्या उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली पाहिजेत असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सूचित केले. तसेच प्रशासन चांगले काम करत असून लॉक डाऊन ची शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कडक अंमलबजावणी करण्याची सूचना त्यांनी केली.यावेळी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी यांनी लॉक डाऊन ची कडक अंमलबजावणी करणे, या लॉक डाउन काळात शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याची सुविधा निर्माण करून देणे व विमा भरण्यास मुदतवाढ देणे तसेच कोरोना तपासणी संख्या अधिक प्रमाणात वाढविणे, लोकांमध्ये कोरोनविषयी जन जागृती करणे, आदी सूचना केल्या व त्यावर अंमलबजावणी करण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच कोरोनाच्या लढाईत सर्व लोकप्रतिनिधी सोबत असल्याचे ही त्यांनी सांगितले. प्रारंभी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनामार्फत बजावण्यात येत असलेल्या भूमिकेची सविस्तर माहिती सादर केली. तसेच लॉक डाउन करणे हा अंतिम पर्याय नाही, पण कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी करण्यास नक्कीच मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *