राज्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापनातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम – क्रीडामंत्री सुनील केदार

मुंबई ,२६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ राज्यात स्थापन करण्यात आले असून  क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापन पदवी आणि पदव्युत्तर या पदव्यांच्या अभ्यासक्रमास विद्यापीठ अनुदान मंडळाने (यूजीसी) मान्यता दिली आहे. हा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षात या विद्यापीठात सुरु करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम देशात प्रथमच महाराष्ट्र राज्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात सुरु होत असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

वानखेडे स्टेडियम येथे माध्यमांशी संवाद साधाताना ते बोलत होते. यावेळी क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरीया, भारताचे माजी डावखरे फिरकी पटू निलेश कुलकर्णी, क्रीडा विभागाच्या उपसचिव श्रीमती नानल यांची उपस्थिती होती.

श्री. केदार म्हणाले, राज्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ हे जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ करण्याचा मानस आहे. क्रीडा विद्यापीठातील सुरु होणारा अभ्यासक्रम राज्यासाठी नवीन आहे. यामध्ये उणीवा राहण्याची  शक्यता नाकारता येत नाही. माध्यमांनी आणि क्रीडा क्षेत्रातील तज्ञांनी सूचना केल्यास त्या सूचनांचे स्वागत करण्यात येईल आणि योग्य त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. देशात विविध भागात 700 पेक्षा जास्त महाविद्यालयात क्रीडा अभ्यासक्रमाचे कोर्सेस सुरु आहेत. त्यांनाही त्या कोर्सेससाठी विद्यापीठामुळे मान्यता मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात गेल्या दीड वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय  विद्यापीठाची घोषणा झाली त्याच वेळी अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार होता, परंतु पूर्ण जगावरच कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव होता. आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे असल्याने अभ्यासक्रम  सुरु करता आला नाही. आता हळूहळू कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याने विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतातील तरुणांसाठी मान्यताप्राप्त पदवीला पर्याय म्हणून क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापन या विषयामध्ये बॅचलर्स आणि मास्टर्स या पदव्यांचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठ अनुदान मंडळाने (यूजीसी) घेतला, त्याचे स्वागत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र, पुणे या संस्थेने केले आहे. क्रीडा शिक्षणाचे नामकरण करण्याची गरज लक्षात घेऊन समकालीन व भविष्याभिमुख अध्यापनशास्त्रात बदल निर्माण करण्यात महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सादर करून भारतात एक संघटित व संरचित “स्पोर्ट्स-एड” क्षेत्र निर्माण करण्यात अग्रेसर ठरलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल असेही श्री. केदार यांनी सांगितले.

राज्यातील दोन्ही सभागृहात विद्यापीठाचा निर्णय एकमताने मंजूर झाला त्याबद्दल सर्व लोक प्रतिनिधींचे श्री. केदार यांनी  यावेळी अभार मानले. भारतातील क्रीडा शिक्षणाच्या विविध घटकांना योग्य ती मान्यता मिळविण्यासाठी श्री. केदार यांनी ‘यूजीसी’च्या अधिकाऱ्यांसोबत जवळून काम केले आहे. “बॅचलर्स इन स्पोर्ट्स सायन्स अँड स्पोर्ट्स मॅनेजमेंट’ या पदवीला मान्यता मिळाल्याने देशातील क्रीडा नैपुण्याच्या परिसंस्थेमध्ये व्यावसायिता निर्माण होईल आणि 10 अब्ज डॉलर मूल्याच्या क्रीडा व्यवस्थापन उद्योगात संधी उपलब्ध होण्यास प्रोत्साहन मिळेल. तसेच, यापूर्वी वित्तीय सेवा व माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांत ज्या प्रमाणे महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य ठरले, त्याचप्रमाणे क्रीडा प्रतिभा समृद्ध करणारे एक अग्रणी राज्य म्हणून ते उदयास येईल असे श्री. केदार यांनी सांगितले.

विविध क्रीडा प्रकारांतील विज्ञान व व्यवस्थापन यांत कुशल व्यावसायिक निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने आपल्याकडे यापूर्वी क्रीडा शिक्षणामध्ये पुनर्कल्पना आणि परिवर्तन घडवून आणण्याचे एकमेव धोरण होते. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन झाल्याने आता तंत्रज्ञान, व्यवस्थापन, क्रीडा प्रशासन यातील विविध पैलूंचा समावेश करून क्रीडा शिक्षणात क्रांती घडवून आणणे आणि क्रीडा क्षेत्रात भारतातर्फे पराक्रम गाजवू शकतील, असे भविष्यातील क्रीडा व्यावसायिक तयार करणे हे आमचे ध्येय तयार झाले आहे. यापुढे व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला भारतीय क्रीडा उद्योगाच्या दीर्घकालीन विकासासाठी त्यातील प्रतिभा, नोकऱ्या आणि क्रीडा बौद्धिक संपत्ती  तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झेप घेता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात वसलेले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ ही शारीरिक व क्रीडा शिक्षण, क्रीडा विज्ञान व क्रीडा वैद्यक, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यमे व संज्ञापन, क्रीडा शिकवणी व प्रशिक्षण या विषयांचे अभ्यासक्रम राबविणारी पहिलीच शिक्षणसंस्था आहे. पहिल्या टप्प्यात २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी, क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापनातील ३ वर्षांचा अभ्यासक्रम, तसेच क्रीडा शिकवणी व प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू करण्यात आला आहे. या संस्थेने क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन व क्रीडा व्यवस्थापन यांसारख्या अभ्यासक्रमांमध्ये ‘आयआयटी’ आणि ‘आयआयएम या संस्थांचे देखील सहकार्य मागितले आहे; जेणेकरुन एकत्रित आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करता येईल असे श्री. केदार यांनी सांगितले.

क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया म्हणाले, “भारतातील क्रीडा परिसंस्थेसाठी ही एक महत्त्वाची घडामोड ठरणार आहे. देशातील तरुणांच्या करिअरला चालना देणाऱ्या प्रमुख अभ्यासक्रमांमध्ये आता क्रीडा हा विषयही महत्त्वाचा ठरेल. अर्थात, या तरुणांना आपण क्रीडा शास्त्रात व्यावसायिक पद्धतीने घडविले पाहिजे. आमचे उद्योग तज्ज्ञ त्यांना क्रीडा व्यावसायिक बनण्यात मदत करतील असे त्यांनी यावेळी सांगितले.