महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी उचलला भर रस्त्यावर पडलेला कचरा

औरंगाबाद,२५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- जळगाव रस्त्याने जात असताना आज शुक्रवारी दुपारी आंबेडकरनगर समोरील भर रस्त्यावर पडलेला कचरा बघून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आपली गाडी थांबवून रस्त्यावर टाकलेला कचरा उचलायला सुरुवात केली.

महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय हे स्वतः कचरा उचलत असल्याचे बघून रस्त्याच्या कडेला उभे असलेले नागरिक आवाक झाले आणि ते ही कचरा उचलण्यासाठी धावून आले मग प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी नागरिकांना सोबत घेऊन रस्त्यावर पडलेला कचरा उचलून रस्ता स्वच्छ केला.

यावेळी प्रशासक पाण्डेय यांनी नागरिकांशी संवाद साधून स्वच्छतेबाबत नागरिकांनी जबाबदार नागरिक म्हणून स्वच्छ शहर ,सुंदर शहर ठेवण्यासाठी नागरिकांनी सतत जागरुक असले पाहिजे, स्वच्छतेचे महत्व लक्षात घेता अशाप्रकारे कोणीही रस्त्यावर कचरा टाकू नये ,नगरपालिकेच्या वतीने कचरा घेऊन जाण्यासाठी घरोघरी घंटागाड्या येतात त्यामध्ये कचरा टाकावा, अशा प्रकारे रस्त्यावर आणि परिसरात कोठेही कचरा करु नये, असे आवाहन मनपा प्रशासक पाण्डेय यांनी केले.