वैजापूर तालुक्यातील तीन वाळूपट्टयांचा लिलाव ; शासनाला मिळाला 8 कोटीचा महसूल

अव्वलगाव वाळूपट्टयाचा 9 मार्चला ई-लिलाव

वैजापूर ,२४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यावरण अनुमतीप्राप्त 14 पैकी 12 वाळूपट्ट्यांचा लिलाव 16 फेब्रुवारी रोजी करण्यात आला असून वैजापूर तालुक्यातील जळगाव, बाभूळगावगंगा व भालगाव या तीन वाळूपट्ट्याच्या लिलावातून शासनाला 8 कोटी 19 लाखाचा महसूल मिळाला आहे.अव्वलगांव येथील गोदावरी नदीच्या पट्टयाचा ई – लिलाव 9 मार्च रोजी होणार आहे.
गेल्या चार-पाच वर्षापासून तालुक्यातील वाळू पट्टयांचा लिलाव झाला नव्हता.लिलाव झालेला नसतांना गोदावरी व शिवना नदीपात्रातून मोठ्याप्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू होता.सन 2021 – 22 या एक वर्षासाठी बुधवारी तालुक्यातील तीन वाळू पट्टयांचा ई-लिलाव झाला तर बोली न लागल्याने अव्वलगाव येथील वाळूपट्टयाचा पुन्हा लिलाव करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती त्यानुसार अव्वलगांव येथील वाळू पट्टयाचा ई-लिलाव दुसऱ्यांदा करण्यात येत आहे. अव्वलगांव येथील वाळू पट्टयात 3534 ब्रॉस वाळूसाठा उपलब्ध असून या वाळू पट्टयाची लिलाव प्रक्रिया 22 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. 9 मार्च 2022 रोजी ई-लिलाव होणार आहे. 

तीन वाळू पट्टयातून 8 कोटीचा महसूल                 

तालुक्यातील बाभूळगावगंगा, भालगाव, जळगाव व अव्वलगाव या चार वाळूपट्टयांना पर्यावरण समितीने लिलावास मंजुरी दिली होती. त्यापैकी बाभूळगांवगंगा, भालगांव व जळगांव या तीन वाळूपट्टयांना बोली लागली.या वाळू पट्टयांना निर्धारित रकमेपेक्षा चांगली बोली लागली. बाभूळगांवगंगा येथील येथील गोदावरीच्या वाळूपट्टयाला 5 कोटी 67 लाख, , जळगांव येथील शिवना नदीच्या वाळू पट्टयाला 1 कोटी 63 लाख तर भालगांव येथील वाळू पट्टयाला 1 कोटी 5 लाख महसूल मिळाला. ठेकेदारांनी लावलेल्या चांगल्या बोलीमुळे शासनाला मोठ्याप्रमाणात महसूल प्राप्त झाला आहे.