दहावी व बारावी परीक्षा ऑफलाईनच होणार:सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली ,२३ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन अर्थात प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर जाऊनच होतील, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या परीक्षा ऑफलाईनच होतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनो आता कंबर कसून अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. 

हा निकाल देताना न्यायालयाने संबंधित याचिकाकर्त्यांना परखड शब्दांमध्ये फटकारले देखील आहे.दहावी आणि बारावीचे विद्यार्थी एकीकडे बोर्डाच्या परीक्षांच्या तयारीत गुंतले असताना दुसरीकडे या परीक्षा कशा प्रकारे घेण्यात याव्यात, हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. यासंदर्भात थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत काही पालक आणि विद्यार्थ्यांनी धाव घेतली होती. यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं एकत्रित सुनावणी घेऊन महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

सुप्रीम कोर्टानं दिलेला हा निर्णय स्टेट बोर्ड, CBSE, ICSE आणि National Institute of Open Schooling (NIOS) या सर्वांसाठी लागू करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या याचिका या विद्यार्थ्यांना चुकीच्या आशा दाखवत असल्याची फटकारही सुप्रीम कोर्टानं लगावली.