राज्यात लोकल प्रवासासहित इतर निर्बंध अद्याप कायम; कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

फटकारल्यानंतरही राज्य सरकारचा नकारघंटा, लशीशिवाय लोकल प्रवास नाहीच!

मुंबई ,२२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाची लाट ओसारत चालली आहे. त्यामुळे अनेक निर्बंध हटवण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमधून प्रवासासाठी असलेली लसीकरण पूर्ण झाल्याची अट रद्द करणार का? अशी विचारणा हायकोर्टाने केली होती. पण, तरीही राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या पदरी निराशा पडली आहे.

कोरोना लशीचे  2 डोस पूर्ण झाले असेल तरच लोकलने प्रवासाची अट राज्य सरकारने घालून दिली आहे.  राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली.पण रेल्वे प्रवास नियमांत कोणतेही बदल केले नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ०८ ऑक्टोबर आणि २६ ऑक्टोबर २०२१ तसेच ८ जानेवारी, दि.०९ जानेवारी दि.३१ जानेवारी २०२२ रोजी निर्गमित केलेले आदेश राज्यात अद्याप लागू आहेत. त्यामुळे लसीकरण न झालेल्या नागरिकांसाठी लोकल प्रवासासहित इतर निर्बंध कायम आहेत. नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

कोविड विषाणूच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी १५ जुलै, १० ऑगस्ट आणि ११ ऑगस्ट २०२१ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्बंधाचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. मात्र  तरीही  ०८ ऑक्टोबर, २६ ऑक्टोबर २०२१, दि. ८ जानेवारी, दि.०९ जानेवारी दि. ३१ जानेवारी २०२२ या तारखांना निर्गमित केलेले आदेश अद्याप लागू आहेत. तरी नागरिकांनी व विविध सेवा देणाऱ्या संस्थांनी लसीकरण झाले असले तरी व झाले नसले तरी सार्वजनिक प्रवास करताना मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, हात वारंवार धुणे अशा कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.