सार्वजनिक आयुष्यात टीका-आरोप : पण त्याची कधी फिकीर बाळगली नाही -शरद पवार

मुंबई ,२२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक वर्षे सार्वजनिक आयुष्यात असताना कधीकाळी टीका-आरोप झाल्याचं सांगितलं.पण त्याची कधी फिकीर बाळगली नाही. अनेकांनी आरोप केले, पण ते आरोप खरे नाहीत हे सिद्ध झालं. त्यामुळे आरोप करणाऱ्यांना पुढे बोलता आलं नाही, असंही शरद पवार यांनी नमूद केलं. 

Image

ते गोरेगावमधील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.

शरद पवार यांनी केलेले भाषण त्यांच्याच शब्दांत :

मुंबईमधील गोरेगाव येथील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा आज शुभारंभ झाला. अनेक वर्षांपासून येथील रहिवाशांचा पुर्नविकासाचा प्रकल्प प्रलंबित होता. आता तो मार्गी लागत आहे याचा आनंद आहे.

गोरेगाव येथे आल्यानंतर दोन गोष्टींची मला प्रामुख्याने आठवण होते. एकतर हा घर बांधणीचा कार्यक्रम आहे. लहान उत्पन्न गट आणि मध्यमवर्गीयांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई शहरात ज्यांनी संघर्ष केला अशा व्यक्तींच्या नामावलीत मला प्रथम मृणालताई गोरे यांची आठवण होते.

आज ज्या मैदानात भूमिपूजन होत आहे इथेही मृणालताईंच्या जाहीर सभेसाठी मी आलो होतो. आज मृणालताई आपल्यात नाहीत. पण त्यांना ज्या प्रश्नांमध्ये आस्था होती, त्या प्रश्नासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री आणि त्यांचे सर्व सहकारी मनापासून लक्ष घालत आहेत.

घर, निवारा या काही लहानसहान गोष्टी नाहीत. या महाविकास आघाडी सरकारने काही गोष्टी हाती घेतलेल्या आहेत आणि त्या गतीनेच पूर्ण करण्याचा निर्धार केलेला आहे. त्यामध्ये निवास हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

वरळी मधील बीडीडी चाळीचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. त्याचे भूमिपूजनही एक-दोनदा झाले, पण त्या कामाला गती नव्हती. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी गृहनिर्माण मंत्री म्हणून जबाबदारी हाती घेतल्यानंतर, मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाने या कामाला सुरुवात केली.

घरांच्या प्रश्नासंबंधी राज्य सरकारला माझी एक सूचना आहे. सामान्य माणसांच्या घरांसोबतच पोलिसांच्या घरासंबंधीही सरकारने लक्ष द्यायला हवं. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पोलिसांच्या जुन्या निवासी जागा आहेत. ती घरे वाईट स्थितीत आहेत. जागा मोठ्या आहेत, मात्र घरे चांगल्या स्थितीत नाहीत.

पोलिस आपले रक्षक आहेत. दिवसाचे १६ तास ते काम करतात. त्यांच्या कुटुंबातील लोकांना चांगला निवारा मिळण्यासाठी आपण लक्ष घालूया. महाराष्ट्रातील गृह खाते आणि गृहनिर्माण खाते यांनी एकत्र बसून प्रस्ताव तयार करावा.

व्यावसायिक दृष्टीकोनातून, उत्पन्न साधनाचा विचार करून, या उत्पन्नातून पोलिसांना दर्जेदार घरे कशी देता येतील, याचा विचार करावा. माझी खात्री आहे, अशा पद्धतीने विचार केल्यास महाराष्ट्रातील विविध भागातील पोलिसांच्या कुटुंबांना समाधान लाभेल.

आज मुंबईसारख्या शहरात झोपडपट्ट्यांचा मोठा प्रश्न आहे. त्याचे निवारण करण्यासाठी धाडसाने निर्णय घेण्याची गरज आहे. टीका टिप्पणी होईल, पण स्वच्छ कारभार करण्याचा आपला निर्धार असल्यानंतर आरोपांची चिंता करायची गरज नाही.

कारण आरोपांची चिंता करून आपण निर्णय घेण्यासाठी थांबलो तर त्याचे दुष्परिणाम सामान्य माणसाच्या विकासावर होत असतात. मी अनेक वर्षे सार्वजनिक जीवनात काम करत आहे. अनेक प्रकारचे उपक्रम राज्यात आणि देशात राबवले. कधी काळी टीका, आरोप झाले. पण त्याची फिकीर केली नाही.अनेकांनी आरोप केले, पण ते आरोप खरे नसल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर आरोप करणाऱ्यांना पुढे बोलता आले नाही. त्यामुळे राज्य सरकारने हाती घेतलेला उपक्रम पूर्ण करावा. घरांच्या कामाला जास्तीत जास्त गती द्यावी. ज्याठिकाणी निर्णय घ्यायचा आहे, तिथे धाडसाने घ्यावा. मला खात्री आहे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी धडाडीने निर्णय घेतील. महाराष्ट्रातील जनता राज्य सरकारच्या पाठिशी उभी राहील, याचा मला विश्वास आहे.