ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शेळी-मेंढी विकास कार्यक्रम महत्त्वाचा – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार

मुंबई ,२२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी  मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्राचे बळकटीकरण व आधुनिकीकरण करण्याबरोबरच शेळी-मेंढी विकास कार्यक्रम राबविणे  महत्त्वाचे असल्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

मंत्रालयात भागभांडवल निधीमधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ प्रक्षेत्राचे बळकटीकरण व आधुनिकरण याविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता, सह सचिव माणिक गुट्टे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शशांक कांबळे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पशुसंवर्धन मंत्री श्री. केदार म्हणाले, राज्यात शेळी-मेंढीपालन व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून किफायतशीर ठरलेला आहे. पशुपालन व्यवसाय हा राज्याच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा भाग आहे कारण राज्यातील ७० टक्के लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. शेळी-मेंढीपालन व्यवसाय दुष्काळी व निमदुष्काळी भागात करण्यात येत असल्याने शासकीय योजनेचा लाभ देवून या व्यवसायास देशात अग्रस्थानी आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. केदार  म्हणाले, महामंडळाचे भागभांडवल ६ कोटी असून रुपये ९४ कोटी प्रस्तावित आहेत. यामध्ये प्रस्तावित ९४ कोटी निधी मधून महामंडळाच्या प्रक्षेत्राचे  बळकटीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये पैदाशीकरिता पायाभूत सुविधा, शेळ्या-मेंढ्यांची खरेदी, नवीन वाडे बांधकाम, शेळ्यांमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रम राबविणे ,मुरघास निर्मिती यंत्रसामग्री खरेदी, शेळी मेंढी पालन प्रशिक्षण केंद्र इमारत बांधकाम, प्रशिक्षणार्थी निवासी इमारत बांधकाम,   जमिन विकास, सिंचन सुविधा, ट्रॅक्टर ट्रॉली, कृषी अवजारे खरेदी व चारा कापणी यंत्र, वैरण गोडावून, शेळी मेंढी खाद्य कारखाना उभारणी, कार्यालय बांधकाम, कर्मचारी निवासस्थान, प्रक्षेत्रावरील आवश्यक साधनसामग्री,  अल्ट्रा सोनोग्राफी मशीन, फिरते शेळी मेंढी चिकित्सालय आदी सुविधा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.