आ.बोरणारे कुटुंबियातील आपसातील वादाला राजकीय स्वरूप देण्याचा विरोधकांचा प्रयत्न

वैजापूर ,२१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- गेल्या काही दिवसांपासून बोरणारे परिवारात आपसांत कौटुंबिक वाद सुरू असून या परिवारातील दोन महिलांमध्ये शुक्रवारी वर्षश्राध्दच्या कार्यक्रमात मारहाणीची घटना घडली.या वादाला आ.बोरणारे यांच्या विरोधकांकडून हवा देण्यात येत आहे तर राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न भाजपतर्फे केला जात असल्याचे चित्र आहे.

गावातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पूर्वीपासून आ.बोरणारे व त्यांच्या चुलत भावजयी जयश्री बोरणारे यांच्यात कौटुंबिक वाद आहे. गुरुवारी केंद्रीय मंत्री भागवत कराड वैजापूर तालुका दौऱ्यावर होते.आ.बोरणारे यांच्या सटाणा या गावी डॉ.कराड यांच्या हस्ते भाजप शाखा व महिला आघाडीच्या कार्यकारिणीचे उदघाटनाचा कार्यक्रम  होता. या कार्यक्रमाला जयश्री बोरणारे या उपस्थित होत्या. जयश्री बोरणारे या शिवसेना आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या चुलत भावजयी असल्याने त्याची चर्चा सुरू झाली. शुक्रवारी जयश्री बोरणारे व त्यांचे पती दिलीप बोरणारे हे वैजापूर शहरातील गोदावरी कॉलनीत सोनवणे यांच्याकडे वर्षश्राध्दच्या कार्यक्रमाला आले होते.आ.बोरणारे यांच्या पत्नी व सख्खी भावजयी या पण या कार्यक्रमाला हजर होत्या.तेथे सटाणा येथील कार्यक्रमाची चर्चा निघाली आणि वादाची ठिणगी उडाली.महिलांमध्ये चांगलाच वाद होऊन एकमेकींना मारहाण करण्यास सुरुवात झाली. महिलांमध्ये भांडणं झाल्याची माहिती मिळताच आ.बोरणारे यांनी आघूर येथील कार्यक्रम सोडून घटनास्थळी धाव घेतली.भाजपच्या कार्यक्रमाला हजेरी लावली म्हणून शिवसेना आमदार रमेश पाटील बोरणारे व त्यांच्या कुटुंबीयांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप त्यांच्या चुलत भावजयी जयश्री बोरणारे यांनी केला. त्यावरून आ.बोरणारे यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.आ.बोरणारे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांच्या चुलत भावजयी जयश्री बोरणारे विरुध्द पोलिस ठाण्यात लगोलग अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाला हवा देण्याचे काम विरोधकांनी सुरू केले असून,भाजपने या प्रकरणाला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.भाजप महिला आघाडीने आ.बोरणारे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

आमचा कौटुंबिक वाद – आ.बोरणारे                 

हा आमचा कौटुंबिक विषय असून,आरोप करणारी महिला ही माझी चुलत भावजयी आहे. तिने तिच्या सासूला म्हणजेच माझ्या चुलतीला घरातून हाकलून दिले होते. दोन-अडीच वर्षांपासून तिचे -आमचे जमत नाही.कुटुंबप्रमुख या नात्याने तिला समजावून सांगणे माझे काम आहे.माझी पत्नी व तिच्यात काही तरी वाद झाला एव्हढेच मला माहित आहे. या वादाला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न कुणीही करू नये.असे आ.बोरणारे यांनी सांगितले.