अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाचा खून प्रियकराच्या मदतीने खून, आईला अटक

प्रियकराची आत्महत्या वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील घटना

वैजापूर ,२१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- प्रेमात अडथळा ठरणाऱ्या मुलाचा त्याच्या आईनेच प्रियकराच्या मदतीने खुन केल्याची घटना तालुक्यातील खंडाळा येथे उघडकीस आली आहे. सार्थक रमेश बागुल (9) असे या घटनेतील मयत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी मुलाची आईसंगिता रमेश बागुल (35) व तिचा प्रियकर साहेबराव माणिकराव पवार (52) रा. खंडाळा (ता. वैजापूर) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार करणारी मुलाची आईच असल्याचे समोर आले आहे.17 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील तलवाडा शिवारातील जंगलातील दरीत पोलिसांना एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता.त्या मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालात मृतदेहाचे वय अंदाजे 35 वर्षाचे असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी नमूद केले होते.

या प्रकरणी शिवूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी शोधपत्रिका प्रसिद्ध केली होती.त्यानंतर वैजापूर पोलिसांचे पथक शिवूर येथे तपास काही गेले.तपास करताना तलावाडा जंगलात सापडलेल्या  त्या मृतदेहाचे कपडे व वैजापूर येथील अपहरण झालेल्या मुलाच्या कपड्यांशी मिळते जुळते असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.वैजापूर पोलिस ठाण्यात संगिता रमेश बागुल या महिलेने 11 फेब्रुवारी रोजी तिचा मुलगा सार्थक याचे कुणीतरी अपहरण केल्याची तक्रार दिली होती.

या मृतदेहावरील कपडे व चप्पल बागुल हिला दाखविण्यात आली.त्यांनी हे कपडे मुलगा सार्थक याचे असल्याचे सांगितले. त्यामुळे संगीता बागूल हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.सार्थकची आई संगीता बागुल हिचे गावातीलच साहेबराव पवार याच्याशी अनैतिक संबंध होते.हे संबंध सार्थक याला समजले होते.त्यामुळे या संबंधात अडसर ठरलेल्या मुलाचा काटा काढण्याचा कट दोघांनी रचला.त्यानुसार मुलाचा खून करण्यात आला.मात्र तलवाडा शिवारात मृतदेह पोलिसांना मिळाल्याची माहीती मिळाल्यानंतर घाबरलेल्या साहेबराव पवार याने विषारी औषध सेवन केले. उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. दोन दिवसांपासून तो एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता.  पोलिसांनी संगीता हिस शनिवारी अटक केली.पोलिस निरीक्षक सम्राट राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम घाडगे, फौजदार रमेश जाधवर, सहाय्यक फौजदार रज्जाक शेख,योगेश वाघमोडे,गोपाळ जानवाल,आर.बी.कवडे यांनी ही कामगिरी केली. वैजापूर पोलिस ठाण्यात खुनाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास फौजदार गोरख खरड हे करीत आहेत.