मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

आचार्य जांभेकर यांचा परखड बाणा पत्रकारितेसाठी मार्गदर्शक

मुंबई,२० फेब्रुवारी / प्रतिनिधी :- आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आचार्य जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.मराठी पत्रकारितेला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा ध्येयवादी वारसा लाभला आहे. त्यांचा निष्पक्ष आणि परखड असा बाणा होता. अनेकविध विषयांचा गाढा अभ्यास आणि जनहितासाठीचे लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आजच्या आधुनिक पत्रकारितेसाठी देखील मार्गदर्शक आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मराठी पत्रकारितेचे जनक, आद्यपत्रकार, ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ वृत्तपत्राची सुरुवात करून मराठी पत्रकारितेचा पाया रचला. मराठी पत्रकारितेला निर्भिड, निष्पक्ष, लोकाभिमुखतेचा वारसा दिला. ‘दर्पण’ वृत्तपत्रातून त्यांनी समाज घडविण्याचे कार्य केले. पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान व कार्य मार्गदर्शक आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी लोकशिक्षण, ज्ञानप्रसाराच्या उद्देशाने पत्रकारितेच्या क्षेत्रातील दिलेले योगदान प्रेरणादायी, मार्गदर्शक आहे. तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या चुकीच्या धोरणांना त्यांनी विरोध केला. वृत्तपत्र हे समाजप्रबोधनाचे, राष्ट्र घडविण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी दिलेली शिकवण अंगीकारणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

राजधानीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

राजधानीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

नवी दिल्ली  : आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी  करण्यात आली.

कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त व सचिव डॉ. निधी पांडे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.