महावितरणमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

औरंगाबाद ,१९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे कर्मचाऱ्यांच्या पाल्यांची वेशभूषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यान, पोवाडा तसेच लष्करात सेवा बजावलेल्या सुरक्षारक्षकांचा सत्कार या उपक्रमांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

     परिमंडल कार्यालय परिसरात आयोजित कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता भुजंग खंदारे होते. यावेळी प्रसिद्ध व्याख्याते प्रा.ए.बी. पठाण, अधीक्षक अभियंता (पायाभूत सुविधा) संजय सरग, शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे, ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, अधीक्षक अभियंता (स्थापत्य) मोहन काळोगे, सहायक महाव्यवस्थापक (मा.सं.) शिल्पा काबरा, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, समितीचे सचिव विनय घनबहादूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

    सुरुवातीला शिवस्वरांजली शाहिरी कलापथकाचे शाहीर विलासराजे बडक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवरायांच्या जीवनकार्यावर आधारित स्फूर्तीदायी पोवाडे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शिवजयंतीनिमित्त यंदाही कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. त्यात पाल्यांनी राजमाता जिजाऊ आणि शिवरायांची हुबेहूब वेशभूषा साकारल्याने मंचावर शिवसृष्टीच अवतरल्याचा आभास निर्माण झाला. या स्पर्धेत लवेश मुळे-प्रथम, राजेश्री शिंदे-द्वितीय, आराध्या पवार-तृतीय तर स्नेहा काटे व अदिती यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. यंदा प्रथमच कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेत मोठ्या गटातून राजलक्ष्मी सूर्यवंशी-प्रथम, कृष्णा सूर्यवंशी-द्वितीय, अदिती चव्हाण-तृतीय तर लहान गटातून शेख अरमान-प्रथम, आनंदी बोढरे-द्वितीय तर कस्तुरी उबाळे हिला तृतीय पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

स्पर्धेचे परीक्षण शिवछत्रपती महाविद्यालयाचे नाट्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.गहिनीनाथ वळेकर यांनी केले. लष्करात उत्कृष्ट सेवा बजावून निवृत्त झालेले तथा सध्या महावितरण कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणूनही उत्तम काम करणारे सुभाष राम स्वरूप, कैलाश धनराज, राम नारायण धोटे यांचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विशेष सत्कार करण्यात आला.

    यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले म्हणाले की, आज महावितरणपुढे विविध आव्हाने उभी ठाकलेली आहेत. आज शिवरायांच्या जीवनकार्याचा आदर्श घेऊन या आव्हानांवर आपण मात करूया. जयंती समितीने यावर्षी राबवलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी प्रा.ए.बी. पठाण यांचे व्याख्यान झाले. छत्रपती शिवाजी महाराज हे आरमाराचे जनक, गडकिल्ले उभारणारे उत्कृष्ट स्थापत्य तज्ञ व अठरापगड जातीजमातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन करणारे महापुरुष होते. त्यांच्या जीवनचरित्राचा आदर्श घेऊन नव्या पिढीने वाटचाल करायला हवी, असे प्रा.पठाण म्हणाले. मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांनी अध्यक्षीय समारोप करताना शिवरायांच्या मानवी पैलूवर प्रकाश टाकला. सामान्य परिस्थितीतून असामान्य स्वप्न बघून जिजाऊंच्या प्रेरणेने शिवरायांनी स्वराज्य साकार केले. दुर्दम्य इच्छाशक्ती, अचूक नियोजनाद्वारे योग्य त्या प्रसंगी वाटाघाटी करून त्यांनी व्यवस्थापनाचे सर्वोच्च मानदंड निर्माण केले. महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही शिवजयंती कार्यक्रमांपुरता उत्साह मर्यादित न ठेवता आयुष्यभर शिवरायांच्या चरित्रातून प्रेरणा घेत आपल्या कामात त्या ऊर्जेचा उपयोग करत सर्वोत्कृष्ट योगदान देण्याचा प्रयत्न करायला हवा, असे ते म्हणाले. 

    समितीचे सचिव विनय घनबहादूर यांनी प्रास्ताविक केले. सहसचिव रमेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड यांनी आभार मानले. समितीचे कोषाध्यक्ष विजय मेटे, राजेश राठोड, संदीप बोर्डे, राजेश चांदणे, श्रावण कोळनूरकर, वाल्मिक निकम, शेख मोहंमद रफिक राजा, प्रकाश जगताप, प्रज्ञा गोपनारायण, सुरेश कोंडके, योगेश राजपूत, कैलास गौरकर, सूर्यकांत कांबळे, अजित साळवे यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. 

   यावेळी कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत, मकरंद कुलकर्णी, शरावती लामकाने, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दिन, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे महामंत्री अरुण पिवळ, सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे प्रादेशिक सचिव अविनाश चव्हाण, महाराष्ट्र विद्युत अभियंता-अधिकारी-कामगार सेनेचे कार्याध्यक्ष शिलरत्न साळवे, सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे माजी सरचिटणीस बालमुकुंद सोमवंशी, सेवानिवृत्त वीज कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी बापूराव शिंदे, वर्कर्स फेडरेशनचे पदाधिकारी पांडुरंग पठाडे, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे परिमंडल अध्यक्ष गौतम पगारे, कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे परिमंडल अध्यक्ष किशोर चोबे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.