राजस्थानात ‘पायलट’ नाराज : काँग्रेसच्या सत्तेचे विमान उतरणार ?

जयपुर : राज्यसभा निवडणूकीनंतर सुरक्षित वाटणारे राजस्थानातील काँग्रेस सरकार पुन्हा संकटात सापडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा युवा चेहरा असलेले उपमुख्यमंत्री सचिन पायलट नाराज असल्याच्या वृत्तामुळे देशात कोरोनाच्या महामारीवेळी हे सरकार कोसळते की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सचिन पायलट आणि त्यांचे नाराज समर्थक सोनिया गांधींच्या भेटीला गेले असल्याचेही समजते. तसेच पायलट यांच्यासह त्यांचे समर्थक दिल्लीतील थांबले असल्याचीही माहिती आहे. 

राजस्थात मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे सरकार संकटात असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मध्य प्रदेशाची पूर्नरावृत्ती राजस्थानातही केली जाऊ शकते, अशी दबक्या आवाजात चर्चाही आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानात काँग्रेस पक्षाने ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट यांना चेहरा म्हणून निवडणूका लढवल्या होत्या, मात्र, विजयानंतर दोन्ही नेत्यांवर उपेक्षेची वेळ आली. परिणामी ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ज्यानंतर कमल नाथ सरकार कोसळले होते. राजस्थानातही अशोक गहलोत यांच्याशी पायलट यांचे मतभेद असल्याचे वारंवार दिसून आले आहे. 

ज्योतिरादित्य व सचिन यांची मैत्री सत्ता पालट करणार का ?

ज्योतिरादित्य व सचिन पायलट हे चांगले मित्र मानले जातात. ज्यावेळी ज्योतिरादित्य यांनी भाजप प्रवेश केला, त्याच वेळी सचिन पायलटही पक्षप्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सध्याची नाराजी गहलोत सरकारवर संक्रांत असल्याचे मानले जात आहे. 
 

राजस्थानातील बलाबल 

राजस्थानातील विधानसभेत काँग्रेसकडे १०७ आमदारांचे समर्थन आहे. एक राष्ट्रीय लोकदलाचा आमदार व १३ अपक्षांचाही पाठींबा आहे. एकूण १२१ आमदारांचे सरकारकडे पाठबळ आहे. राज्यसभा निवडणूकीत काँग्रेसचे बळ जास्त दिसून आले होते. २०० आमदारांच्या विधानसभेत काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. भाजपकडे ७२ आमदार आहेत. बहुमतासाठी किमान २९ आमदारांची गरज आहे. दरम्यान, पायलट यांच्यासोबत दिल्लीत काही अपक्ष आमदारही उपस्थित असल्याचे समदते. 

केवळ अपक्षांचा पाठींबा पुरेसा नाही

गहलोत यांचे १३ आमदार फुटून भाजपकडे आले तर हा आकडा ८५ पर्यंत पोहोचतो. भाजप बहुमताच्या आकड्यापासून सध्यातरी दूर आहे. अपक्षांनी पाठींबा काढून घेतल्यानंतरही काँग्रेसला फारसा फरक पडणार नाही. मात्र, पायलट यांच्या मागे असलेल्या नाराज आमदारांनी राजीनामा दिला तर मध्य प्रदेशप्रमाणेच इथेही सरकार कोसळ्याची शक्यता आहे.

पायलट आणि २४ आमदार करणार का करीश्मा ? 

मध्य प्रदेशा प्रमाणेच काही आमदार राजीनामा देतात आणि अपक्ष भाजपला पाठींबा देतात, तर राजस्थान सरकार अल्पमतात येऊ शकते. २४ आमदारांनी राजीनामा दिला तर हा पुढील खेळी भाजपला यशस्वी खेळता येईल. पायलट यांची नाराजी सोनिया गांधींना दूर करता आली नाही तर हे आमदार राजीनामा देऊ शकतात. यापैकी काही आमदार गुडगाव मानेसर या हॉटेलमध्ये आहेत. 

राजीनाम्यानंतर काय ?

पायलट समर्थक आमदारांनी राजीनामा दिला तर काँग्रेस आमदारांची संख्या ८३ वर येऊन पोहोचेल. यानंतरही अपक्ष आमदार सरकारसोबत राहिले तर सरकार स्थिर राहू शकते परंतू ते किती काळ हे सांगता येत नाही. जर अपक्षांनीही पाठींबा काढून घेतला तर काँग्रेस बहुमत गमावून बसेल.

कसे स्थापन होणार भाजप सरकार ? 

काँग्रेसच्या २४ आमदारांनी राजीनामा दिला तर एकूण विधानसभा सदस्यांची संख्या १७६ होईल. बहुमत सिद्ध करण्यचा आकडा हा ८९ वर पोहोचेल. भाजपकडे ७२ आमदार आहेत. जर १३ अपक्षांचा पाठींबा मिळाला तर भाजपचा आकडा ८५ पर्यंत पोहोचेल. यात विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपाल यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे. यापूर्वी कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार उलथवून लावत भाजपने सरकार स्थापन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *