एबीसीने जिंकला आयकॉन 2022 चषक

औरंगाबाद,१८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- एमजीएम मैदानावर झालेल्या क्रिकेट सामन्यात एबीसीने क्रेडाई संघावर 4.5 षटके व 5 गडी राखून विजय मिळवला. एबीसीने आयकॉन चषकावर आपले नाव कोरले. एबीसीच्या नाणी सय्यद या अष्टपैलु खेळाडूला प्लेअर ऑफ द मॅच निवडण्यात आले.
यावेळी या अंतिम सामन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रिय उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त मनोजकुमार राजक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहा. आयुक्त जी. श्रीकांत, सहा.आयुक्त रवींद्र गरकळ, अधीक्षक गोपाल मांझी, आयकॉन स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश राठी, करण दर्डा, क्रेडाई प्रेसिडेंट नितीन बागडिया, एमजीएम कुलसचिव आशिष गाडेकर, नवीन बागडिया, अध्यक्ष एबीसीए रवींद्र कुडंलवाल, रवि खिवंसरा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
क्रेडाईने 15 षटकात प्रथम फलंदाजी करून 5 बाद 114 धावा केल्या. अजित मुळेचे नाबाद अर्धशतक व त्याला सुयोग माच्छरने दिलेली साथ या जोरावरच क्रेडाई संघाला षटकामागे साडेसात धावांची गती राखता आली.

अजित मुळे: नाबाद 61 धावांची अर्धशतकी खेळी

अजित मुळे व सुयोग माच्छर या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी नोंदवली. अजित मुळेने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद 61 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याने 47 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने 61 धावा काढल्या. सुयोग माच्छरने 16 चेंडूत 30 धावा काढताना सहा चौकार लगावले. अमित भंडारीने 13 धावांची खेळी केली. एबीसीतर्फे शेख कैफ हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 18 धावात 2 गडी बाद केले. नाणी सय्यद, नितीन करोडीवाल आणि विनोद के यांनी प्रत्येकी एक एक बळी घेतला. एबीसी संघाने निर्धारित लक्ष्य 10.01 षटकातच गाठले. एबीसीने 10.01 षटकात 5 बाद 116 धावा काढून अंतिम लढत जिंकली. नाणी सय्यदची टोलेबाजी, नितीन करोडीवालची जोरदार फलंदाजी आणि विठ्ठल कुमावतने केलेल्या 20 धावा या जोरावरच एबीसी संघाने सहजपणे विजय मिळवला. या अंतिम सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच चा मान नाणी सय्यद ठरला.

यावेळी नीरज बडजाते, गणेश पगारिया, बालाजी पाटील, प्रमोद खैरनार, पंकज पांडे, नवनीत भारतीया, महेश लाबशेटवार, मनोज काला, एन.जी.कारखाने, सुनील बामनोतकर, विकास चौधरी, पापालाल गोयल, प्रकाश पाटणी हे उपस्थित होते.
आयकॉन डिलाइट संघ विजयी
सुपर लिग सामन्यात आयकॉन डिलाइट संघाने विजय मिळवताना आयकॉनिक आयकॉन्सचा पराभव केला. आयकॉनिक आयकॉन्सने 10 षटकांमध्ये 7 बाद 85 धावा काढल्या. गणेश पगारिया (10), अमरिश (29), हर्ष कुलकर्णी (नाबाद 13) या फलंदाजांनाच दोन आकडी धावा काढता आल्या. समीर मुळे, प्रमोद खैरनार आणि राजेश वरगंटवार हे यशस्वी गोलंदाज ठरले. त्यांनी प्रत्येकी दोन दोन गडी बाद केले. आयकॉन डिलाइटने निर्धारित लक्ष्य गाठताना अवघा एक गडी गमावला. आयकॉन डिलायटने 8.4 षटकात 1 बाद 86 धावांची मजल मारली. आशिष गाडेकरने 8 चेंडूत 16 धावा काढल्या. त्याने 1 चौकार 1 षटकार लगावला. फलंदाजीतून त्यांनी निवृत्ती पत्करली. अनिल अग्रहारकरने 13 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीने 24 धावा फटकावल्या. समीर मुळेने 6 चेंडूत 13 धावा काढल्या. प्रमोद खैरनारने बारा धावांची खेळी केली. सारंग बागला हा आयकॉनिक आयकॉन्सतर्फे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने एक बळी घेतला. या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच म्हणून समीर मुळेची निवड झाली.
महिलांच्या सामन्यात आयकॉन पिंक विजयी

विजेत्या संघाला केंद्रिय उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त मनोजकुमार राजक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहा. आयुक्त जी. श्रीकांत, आयकॉन स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश राठी, क्रेडाई प्रेसिडेंट नितीन बगडिया, धनराज गिरधर, एबसीएचे अध्यक्ष राजेंद्र कुडंलवाल, पंकज पांडे यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले.


दुसऱ्या सुपर लिग सामन्यामध्ये आयकॉन पिंकने आयकॉन रेड संघाचा 24 धावांनी पराभव केला. आयकॉन पिंकने प्रथम फलंदाजी करून 8 षटकामध्ये 7 बाद 68 धावा काढल्या. संखुती पटेल व अपूर्वा तोंडे या सलामीच्या जोडीने 3.5 षटकातच 46 धावांची सलामी दिली. पटेलने 14 चेंडूत 2 षटकार व एका चौकाराच्या साह्याने 24 धावा काढल्या. अपूर्वा तोंडेने 14 चेंडूत 27 धावा फटकावल्या. आयकॉन रेड तर्फे शीतल बागडे ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. शीतलने 2 षटकात 10 धावा देऊन 3 विकेट घेतल्या. संमृद्धी डावखा व प्रसन्ना तापडीया यांनी प्रत्येकी एक एक गडी बाद केला. आयकॉन रेड संघाला निर्धारित आठषटकामध्ये 7 बाद 44 धावांचीच मजल मारता आली. महिलांच्या सामन्यात आयकॉन पिंक विजयी ठरली. या सामन्यात अद्यष्टपैलु कामगिरी नोंदवणाऱ्या अपूर्वा तोंडेला प्लेअर ऑफ द मॅचचा मान मिळाला.