जैवसुरक्षा श्रेणी-3 (BSL-3) या पहिल्या फिरत्या प्रयोगशाळेचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते आज लोकार्पण

मुंबई/ नाशिक, १८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म विषाणूपासून होणारे  कोव्हीड सारखे  इतरही संभाव्य प्राणघातक आजार टाळण्यासाठी  प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन (PM – ABHIM ) च्या अंतर्गत  तयार केलेल्या जैवसुरक्षा श्रेणी-3 (BSL-3) या पहिल्या फिरत्या प्रयोगशाळेचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री  डॉ. भारती  प्रवीण पवार यांच्या हस्ते  आज लोकार्पण करण्यात आले.

जवळपास 25 कोटी रुपये  खर्चून तयार केलेल्या या फिरत्या  प्रयोगशाळेचे आज  नाशिक येथील   महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या एका कार्यक्रमात  लोकार्पण झाले. यावेळी  आरोग्य संशोधन संचालनालयाचे सचिव आणि भारतीय  वैद्यकीय  संशोधन परिषदेचे  महासंचालक डॉ बलराम भार्गव, आरोग्य संशोधन संचालनालयाच्या सहसचिव अनु नागर, भारतीय  वैद्यकीय  संशोधन परिषद -राष्ट्रीय  विषाणू संस्था  पुणेच्या  संचालक  डॉ. प्रिया अब्राहम ,  एन आय व्ही पुणे येथील प्राणीजन्य आजार अध्यासनाचे प्रमुख डॉ देवेंद्र मौर्या आणि मुंबईतील क्लेंज़ाईड्स प्रतिबंधक क्षेत्र नियंत्रण या खाजगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हरिष शहानी उपस्थित होते 


 “ बायोसेफ्टी श्रेणी 3 फिरती प्रयोगशाळा हे आत्मनिर्भर भारताच्या निर्धाराचे उदाहरण आहे, दूरदृष्टी असलेले नेतृत्व असेल तर देशाची खूप प्रगती होते असे गौरवोद्गार भारती पवार यांनी आपल्या मनोगतात काढले.कोरोना काळात देशापुढे एकाच वेळी अनेक प्रश्न निर्माण झाले मात्र देशात लॉकडाऊन असतानाही  नेतृत्वाने मोफत अन्नधान्य , थेट निधी हस्तांतरण आणि आवश्यक सोयीसुविधा पुरवत कोविड प्रतिबंधासाठी विविध  उपाययोजना केल्या . त्याचबरोबर कोविडवर उपयुक्त ठरेल अशी लस निर्माण करण्याच्या  प्रयत्नांना गती दिली .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने ही सर्व आव्हाने पूर्ण करत आज १७४ कोटी लस मात्रा देण्याच्या उद्दिष्ट ही पूर्ण केले आहे असे त्यांनी सांगितले .


कोविड काळातील विविध आव्हानांना तोंड देतानाच , भविष्यासाठी आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि सुसज्ज यंत्रणा यंत्रणा तयार करण्यावर    केंद्रसरकारने भर दिला असे त्यांनी आवर्जून सांगितले आणि सर्व केंद्रीय यंत्रणा दरदिवशी विविध राज्य सरकारशी संपर्क ठेवत या विषाणूच्या  विविध रूपांचा कसा सामना करते याविषयी उपस्थिताना अवगत केले. 


केंद्र सरकारने देशात आरोग्य विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अर्थ संकल्पात प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन योजने अंतर्गत 64  हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून देशाच्या इतिहासात आरोग्य क्षेत्रासाठी एव्हढी मोठी तरतूद प्रथमच केली आहे असे त्या म्हणाल्या .
दक्षिण पूर्व आशियातील पहिली बायोसेफ्टी श्रेणी 3 फिरती प्रयोगशाळा महाराष्ट्रात निर्माण केल्याबद्दल पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांचे आभार मानले . आय सी एम आर-राष्ट्रीय विषाणू संस्था आणि क्लेंज़ाईड्स कंपनी   यांनी एकत्रितपणे काम करत अत्यंत अत्याधुनिक अशी बायोसेफ्टी श्रेणी 3 फिरती प्रयोगशाळा, संपूर्ण भारतीय साहित्य वापरून केल्याबद्दल त्यांनी सर्व शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचे कौतुक केले.


सर्वाधिक घातक अशा संसर्गजन्य विषाणूचा शोध /तपास करण्यास सक्षम अशा या फिरत्या  प्रयोगशाळेचे  लोकार्पण हा आत्मनिर्भर भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे असे डॉ बलराम भार्गव म्हणाले.
अशा प्रकारची अत्याधुनिक प्रयोगशाळा तयार करण्याचा निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाचे   शाहनी यांनी कौतुक केले. यासाठी आय सी एम आर  सोबत असलेले सहकार्य अत्यंत उत्कृष्ट होते ,या प्रयोगशाळेसाठी वापरण्यात आलेले 95 टक्के साहित्य भारतात बनलेले आहे,असे त्यांनी सांगितले  . अत्याधुनिक अशा या प्रयोगशाळेतील रियल टाइम डेटा हा  आय सी एम आर ला थेट उपलब्ध होईल हे याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, असे ते म्हणाले संभाव्य विषाणू संसर्गासाठी  सतत सज्ज राहायला हवे हे आपल्याला कोविड महामारीने शिकवले असे सांगत आय सी एम आर -एन आय व्ही च्या संचालक डॉ. प्रिया अब्राहम  म्हणाल्या की, अशा प्रकारची ही पहिली फिरती प्रयोगशाळा कुठल्याही संसर्गाचा सामना करण्यासाठी, त्याचे त्वरित निदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असा त्यांना  विश्वास आहे

प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाचा (PM-ABHIM) भाग म्हणून आरोग्य संशोधन संचालनालय आणि  भारतीय वैद्यकीय परिषद (ICMR) यांनी एक स्वदेशी बनावटीची बायोसेफ्टी श्रेणी-3 ची प्रतिबंधक क्षेत्रासाठी खास    बनवून घेतली आहे.  या प्रयोगशाळेच्या मदतीने, नव्याने येणाऱ्या, आणि पुनःपुन्हा येणाऱ्या विषाणूजन्य संसर्गाचा शोध घेता येईल. 
बायोसेफ्टी श्रेणी-3 फिरत्या  प्रयोगशाळेविषयी आयसीएमआर आणि क्लेंज़ाईड्स कंपनीने एकत्र येत, भारतातील पहिली  फिरती बीएसएल-3 अद्ययावत प्रयोगशाळा- बायोक्लेंज़® ची रचना करत ती विकसित केली आहे.
बायोक्लेंज़® ची निर्मिती क्लेंज़ाईड्सने त्यांच्या सर्वोत्तम सुविधांचा वापर करत केली आहे. भारत बेञ्ज बस चेसिस (सांगाडा)  वर ही प्रयोगशाळा बांधण्यात आली असून ती कुठेही- अगदी दुर्गम भागात देखील सहजपणे, कुठल्याही इतर साधनांची मदत न घेता, एखाद्या बसप्रमाणे घेऊन जाता येते .फिरत्या बीएसएल- 3 प्रयोगशाळेची वैशिष्ठ्ये बायोक्लेंज़®बीएसएल- 3 ही एक अत्याधुनिक आणि सुसज्ज, स्वयंपूर्ण अशी प्रयोगशाळा असून या संशोधनासाठी आवश्यक अशी सर्व व्यवस्था आणि उपकरणे या प्रयोगशाळेत आहेत. त्यामुळे जिथे परीक्षण करायचे असेल, तिथे इतर कुठल्याही अतिरिक्त उपकरणांची गरज भासणार नाही.


ही प्रयोगशाळा हवाबंद असून, तिथे प्रवेश नियंत्रित आणि जैव-संसर्ग प्रतिबंधक असेल. या प्रयोगशाळेत एचईपीए फिल्टरेशन आणि जैविक द्रवरुप कचरा  संसर्ग प्रतिबंधक व्यवस्था देखील आहे, यामुळेच, या प्रयोगशाळेला बीएसएल-3 अत्याधुनिक असा दर्जा मिळाला आहे.अतिशय आधुनिक अशा स्वयंचलित नियंत्रण व्यवस्थेद्वारे तिचे नियंत्रण केले जाऊ शकेल,ज्यामुळे, संशोधनाच्या जागी हवेचा निगेटिव्ह दाब कायम ठेवला जाईल. तसेच उपकरणांच्या गुणवत्तेचे निकष आणि आवश्यक त्या महितीचे व्यवस्थापन देखील केले जाईल.
बायोक्लेंज़® प्रयोगशाळेत, दोन बायोसेफ्टी कॅबिनेट्स (श्रेणी II A2 प्रकार) असून त्यात, नमुने हाताळणी, निर्जंतुकीकरणासाठी ची ऑटोक्लेव्ह व्यवस्था, गतिमान पद्धतीचे पास बॉक्स आणि जलद हस्तांतरण व्यवस्था-ज्याद्वारे सर्व साहित्य लॅबच्या आतबाहेर जलदगतीने नेता येतील.


लॅबमधील इतर महत्वाच्या उपकरणांमध्ये कार्बनडाय ऑक्सईड इनकयूबेटर , ऑटोमेटेड न्यूक्लिक अॅसिड बाहेर काढणारी यंत्रणा, पीसीआर वर्कस्टेशन, शीत सेंट्रीफ्यूज, डीप फ्रीजर (-80֯C & -20֯C) यांचा समावेश आहे. या प्रयोगशाळेत अनेक प्रकारच्या सुरक्षा उपायांची व्यवस्था करण्यात आली असून, त्यामुळे काम करण्यासाठी अतिशय सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे.  
या प्रयोगशाळेमुळे देशाच्या दुर्गम आणि सुदूर भागात जाता येईल जिथे आयसीएमआरचे – एनआयव्ही, आरएमआरसी – गोरखपूर या सारखे आयसीएमआरचे विशेष प्रशिक्षित वैज्ञानिक मनुष्य आणि प्राण्यांच्या नमुन्यांची चाचणी करून महामारीच्या उद्रेकाचा शोध घेऊ शकतील. या प्रतिबंधित क्षेत्रासाठीच्या फिरत्या प्रयोगशाळेत हवा खेळती ठेवण्याची, संपर्काची अद्ययावत सोय आणि समुदायात संसर्ग पसरण्याचा धोका कमी असल्याने या नमुन्यांवर जलदगतीने प्रक्रिया करून सुरक्षितपणे चाचणी केली जाऊ शकेल. या कामांमुळे अशा आजारांचा उद्रेक झाल्यास त्यावर त्या जागी आणि योग्य वेळेत निदान करुन उपाययोजना सुरु करता येतील. वेळीच हस्तक्षेप केल्याने महामारीचा उद्रेक नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि प्रतिबंध ठेवून योग्य रुग्ण व्यवस्थापन करता येईल. कोविड महामारीच्या काळात, अशा त्वरित प्रतिसाद यंत्रणेचे महत्व ऐरणीवर आले होते.